संयुक्त राष्ट्राच्या अहवालातील धक्कादायक माहिती
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये धार्मिक स्वातंत्र्याची स्थिती सातत्याने बिघडत चालली असल्याचे दिसत आहे. कट्टरपंथी विचारधारेमुळे तिथे हिंदूंसह इतर अल्पसंख्यक वर्गाचे लोक सुरक्षित नसल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यातच आता ही माहिती संयुक्त राष्ट्राच्या (यूएन) एका ताज्या अहवालातून उघड झाली आहे. पाकिस्तानमध्ये इम्रान खान सत्तेत आल्यानंतर अल्पसंख्यकांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्रांत महिलांच्या स्थितीवर आयोगाने ‘पाकिस्तानः धार्मिक स्वातंत्रतेवर हल्ला’ या शीर्षकाने एक अहवाल जारी केला आहे. 47 पानांच्या या अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकार अल्पसंख्यकांवर हल्ल्यासाठी कट्टरपंथीय विचारांना प्रोत्साहन देत असल्याचे म्हटले गेले आहे.
अल्पसंख्यक विशेषतः हिंदू आणि ख्रिश्चन समाजाला सर्वाधिक धोका आहे. प्रत्येकवर्षी या दोन्ही धर्मातील शेकडो महिला आणि मुलींचे अपहरण करुन त्यांचे धर्म परिवर्तन केले जात आहे. मुस्लिम पुरुषाबरोबर बळजबरीने लग्न करण्यास भाग पाडले जाते. लग्न झाल्यानंतर धमक्या दिल्या जात असल्यामुळे पीडित महिलांना कुटुंबाकडे जाण्याची आशाही उरत नाही. आयोगाने अल्पसंख्यक विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनी त्यांचे शिक्षक आणि सहकारी विद्यार्थ्यांकडून सातत्याने अपमानित केले जात असल्याचे सांगितले.
पाकिस्तानचे पोलिस आणि न्याय व्यवस्थेवरही या अहवालात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. पीडित अल्पसंख्यकांप्रती पाकिस्तान पोलिस आणि देशातील न्यायपालिकाही भेदभाव करते, असे या अहवालात म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये ईश निंदा कायद्याचा उपयोग अल्पसंख्यकांच्या छळासाठी केला जातो. पाकिस्तानमध्ये झुंड बळींच्या घटनाही वाढल्या आहेत.
पाक सरकारने आपल्या देशात सुरु असलेल्या अल्पसंख्यकांचे बळजबरीने होत असलेले धर्मांतर रोखण्यासाठी नोव्हेंबरमध्ये एका संसदीय समितीची स्थापना केली आहे. ही समिती यासाठी कायदा करेल, असे सांगण्यात येते.