कामशेत (चेतन वाघमारे) – गावकारभारी निवडण्यासाठी दाखल होणारे अर्ज, माघारीची प्रक्रिया आता पार पडली आहे. सरपंच होण्याची इच्छा मनाशी बाळगून असलेल्या अनेक इच्छुकांनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ऐन हिवाळ्यात राजकीय चर्चांनी गावागावांत अन् चौकाचौकांत वातावरण गरम होत आहे. “मीच सरपंच होणार…!’ नव्हे तर “मतदार कोणाच्या पारड्यात मताचे दान टाकणार?’ याविषयी उत्सुकता शिगेला पोचली आहे. दुसरीकडे “व्हायचे सरपंच, तर करा खर्च!’ अशी गत इच्छुक उमेदवारांची होतेय.
तालुक्यातील अनेक लहान-मोठ्या ग्रामपंचायतींचे कारभारी निवडून देण्यासाठी निवडणूक पार पडणार आहे. तसेच जनतेच्या मनातील व्यक्ती थेट सरपंचपदावर विराजमान होणार असल्यामुळे राजकीय रंगत वाढू लागली आहे. अनेक गावांत तर मतदारांचा कौल स्पष्ट होत नसल्याने निवडणुकीत चुरस वाढण्यासोबतच इच्छुकांच्या हृदयाचे ठोके वाढविणारी ठरते आहे. दुसरीकडे अखेरच्या दिवसापर्यंत प्रचाराचा आलेख चढता ठेवण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची धावपळ होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.
छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेनंतर सुमारे दहा दिवसांचा कालावधी उमेदवारांना प्रचारासाठी अन् मतदारांना विचार करण्यासाठी मिळाला आहे. मात्र हा कालावधी उमेदवारांवर वातावरण टिकविण्याचा “दबाव’, तर मतदारांना मिरवून घेण्यासाठी “रुबाब’ वाढविणारा ठरणार आहे. अनेक गावांमध्ये रिंगणातील उमेदवार मागील काळात केलेली विकासकामे सांगून मते मागत आहेत, तर काहींनी परिवर्तन होणे आवश्यक असल्याचे सांगत मतदारांना साद घालणे पसंत केले आहे.
काही गावांतील नवख्या इच्छुकांनी मात्र परंपरागत सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही नको म्हणत नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी, असा सूर घेतला आहे. या सर्व राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या धुरळ्यात मतदारांचे पक्के मनोरंजन होणार असल्याचे जाणकार सांगत आहेत. यातही दर पाच वर्षांनी येणारी निवडणूक म्हणजे काही दिवस होणारी “दिवाळी’ समजून “जेवणावळी’चा मिळेल तेथून आस्वाद घेणाऱ्यांची ही संख्या गावागावांत असल्याने, त्यांचे चोचले पुरविणे उमेदवारांना ऐन थंडीत “घाम’ फोडणारे ठरते आहे.
सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सदस्य संख्यानिहाय खर्चाची मर्यादा
सदस्य संख्या 7 ते 9 : 25,000 रुपये
सदस्य संख्या 11 ते 13 : 35,000 रुपये
सदस्य संख्या 15 ते 17 : 50,000 रुपये
सरपंच पदाच्या निवडणूकीसाठी ग्रामपंचायत सदस्य संख्येनिहाय खर्चाची मर्यादा;
सदस्य संख्या 7 ते 9 : 50,000 रुपये
सदस्य संख्या 11 ते 13 : 1,00,000 रुपये
सदस्य संख्या 15 ते 17 : 1,75,000 रुपये