प्राग – करोनाच्या वाढत्या धोक्यामुळे जर अत्यंत प्रतिष्ठेची विम्बल्डन टेनिस स्पर्धा करोनाच्या धोक्यामुळे रद्द केली गेली आहे तर उर्वरित तीनही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धादेखील रद्द करा अशी मागणी चेक प्रजासत्ताकची अव्वल टेनिसपटू पेट्रा क्विटोव्हाने केली आहे.
करोनाचा धोका अद्याप कायम आहे. हा धोका वाढत असताना विम्बल्डन स्पर्धा आयोजकांनी अत्यंत योग्य वेळी ही स्पर्धा इतिहासात प्रथमच यंदा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तशीच काळजी अमेरिकन ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन व फ्रेंच ओपन स्पर्धा आयोजकांनीही घेतला पाहिजे. सध्या खेळाडू, सपोर्ट स्टाफ तसेच प्रेक्षक यांच्या आरोग्याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. करोनाचा धोका असताना टेनिस कोर्ट रिकामे ठेवून स्पर्धा घेण्यात काहीही अर्थ नाही त्यापेक्षा यंदाच्या उर्वरित तीनही ग्रॅण्डस्लॅम रद्द करणेच योग्य ठरेल, असेही मत तिने व्यक्त केले आहे.
खेळ कोणताही असो तो प्रेक्षकांच्या उपस्थितीतच खेळला जावा. आजची परिस्थिती त्यासाठी अनुकूल नाही. मग मैदान रिकामे ठेवून खेळ आयोजित करण्याचा अट्टहास कशासाठी? प्रेक्षकांची उपस्थिती व त्यांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचे असते आणि तेच जर मिळणार नसेल तर कोणासाठी मैदानात उतरायचे, असा सवालही पेट्राने केला.
कोर्टवर उतरून जेव्हा खेळाडू सामना खेळतो तेव्हा केवळ आपल्या कामगिरीसाठीच खेळत नाही तर आपल्याला पाठिंबा देत असलेल्या चाहत्यांना आनंद व समाधान देण्यासाठी खेळत असतो. करोनाचा धोका समोर असताना कोणाचा जीव धोक्यात घालून स्पर्धा आयोजित करणे पटण्यासारखे नाही. कारण एकवेळ प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही तरी बॉलबॉय, पंच व सपोर्ट स्टाफ यांना तर प्रवेश द्यावाच लागेल मग त्यांच्या सुरक्षेचे काय, असेही तिने विचारले आहे.