घर हा जिव्हाळ्याचा विषय. प्रत्येकालाच कमी वेळेत घर खरेदी करणे शक्य नसते. मात्र, काही मंडळी बाजाराच्या स्थितीचे अवलोकन करत घर खरेदी करण्याचे धाडस दाखवतात. सध्याच्या काळात घराच्या वाढत्या किमती पाहता बहुतांश मंडळी सुरुवातीचा काळ भाड्याच्या घरातच राहणे पसंत करतात. मात्र कोणत्या ठिकाणी भाड्याने राहणे उपयुक्त आणि कोठे खरेदी करणे गरजेचे, हे समजणे महत्त्वाचे आहे. अलीकडेच देशातील बारा शहरात रिअल इस्टेटच्या ट्रेंडवर लक्ष ठेवणारा अहवाल प्रसिद्ध झाला. या आधारावर आपण कोठे घर खरेदी करावे आणि कोठे भाड्याने राहावे, याचे आकलन येते. आपल्याला कोणत्या गोष्टी फायदेशीर आहेत, हे समजायला हातभार लागतो. कारण अनेक मंडळी घर खरेदी करण्यावरून आणि भाड्याने राहण्यावरून संभ्रमात असतात. त्यामुळे “बाय वर्सेस रेंट’ या अहवालात 2019 च्या देशभरातील 12 शहरातील रिअल इस्टेटचा ट्रॅक ठेवण्यात आला आहे.
या अहवालानुसार घर खरेदीसाठी सर्वात उपयुक्त शहरे म्हणजे इंदूर, जयपूर, अहमदाबाद, लखनौ, कोची, हैदराबाद, कोलकाता, बंगळुरू, पुणे, चेन्नई, दिल्ली, मुंबई याचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. हा अहवाल तयार करण्यासाठी किंमत आणि भाडे या दोन्हीची गणना एक हजार वर्ग फूट रेडी टू मूव्ह रेसिडेन्सियल प्रॉपर्टीचा आधार घेतला आहे. वार्षिक एकूण उत्पन्न 8 लाख रुपये असे म्हटले आहे. घराच्या एकूण किमतीच्या 20 टक्के डाऊनपेमेंटची रक्कम गृहित धरली आहे. गृहकर्जाचा कालावधी सर्वसाधारणपणे 15 वर्षाचा असतो आणि त्याचा व्याजदर 8.55 टक्के वार्षिक असे गृहित धरले आहे. कोणतेही घर खरेदी करण्यापूर्वी किंवा भाड्याने घेण्यापूर्वी घरावर किती खर्च आला, त्यानुसार भाडे कितपत मिळू शकते किंवा आकारले जाऊ शकते याचा अंदाज बांधला जातो. गेल्या वर्षापासून ते आजतागायत मालमत्तेच्या किंमतीत 11.59 टक्के वाढ झाली आहे, तर त्याचवेळी भाडे 9.79 टक्के वाढले आहे.
– जगदीश काळे