नवी दिल्ली – दिवाळीसाठी खरेदी करताना शक्यतो स्थानिक वस्तुंच्या खरेदीवरच भर द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. व्होकल फॉर लोकल या घोषणेचा पुनरूच्चार करताना त्यांनी लोकल फॉर दिवाली अशीही घोषणा करीत हे आवाहन केले.
स्थानिक वस्तुंच्या खरेदीला प्राधान्य दिले गेल्यास अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकेल असे त्यांनी नमूद केले. नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना मोदी यांनी नमूद केले की, लोकलचा मंत्र लोकांनी जपल्यामुळे सगळीकडे सध्या दिवाळीची रौनक दिसून येत आहे. वाराणसीतील विविध प्रकल्पांच्या कामांना आज त्यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे प्रारंभ झाला. त्यावेळी बोलताना त्यांनी हे आवाहन केले.
स्थानिक वस्तुंची खरेदी करा म्हणजे केवळ बाजारातून दिवे किंवा पणत्याच घेऊ नका तर दिवाळीसाठी तुम्ही ज्या ज्या वस्तू वापरता त्या स्थानिक उत्पादनाच्याच असाव्यात याकडे कटाक्षाने लक्ष द्या अशी सुचनाहीं त्यांनी नागरिकांना केली.