पुणे – हडपसर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या 27 दुचाकी आणि एक पिस्तूल असा 19 लाखाचा ऐवज हस्तगत केला आहे. कार्तिक प्रकाश भुजबळ (रा अंबरनाथ मंदिर शेजारी लोणी काळभोर), योगेश नवनाथ वजाळे उर्फ टकल्या (रा अंबिका माता मित्र मंडळ लोणी काळभोर), अभिषेक अनिल भडंगेर (रा.कृषित अपार्टमेंट हडपसर) हे तिन्ही ही इसम हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत. तर दुसऱ्या घटनेत निलेश मधुकर आरते ( 23 रा तुकाई दर्शन हडपसर) व संजय हरीश भोसले उर्फ सोन्या (रा शेवाळवाडी हडपसर) यांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार हडपसर हद्दीत घरफोडी वाहन चोरी,चैन चोरी प्रतिबंध करण्यासाठी पेट्रोलिंग करीत असताना सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण पोलिस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड , विनोद शिवले, नितीन मुंढे, अकबर शेख , प्रशांत टोनपे, शाहिद शेख यांना शेवाळवाडी फाटा या ठिकाणी वरील आरोपी दुचाकीवरून येताना दिसले. त्यांस थांबण्याचा इशारा केला असता ते न थांबता पळून जाऊ लागले. यामुळे पथकाने त्यांस पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांना पळून जाण्याचे तसेच त्यांचे ताब्यातील दुचाकी बाबत विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल. यामुळे त्यांना हडपसर पोलीस स्टेशन येथे आणून रेकॉर्ड तपासले असता कार्तिक प्रकाश भुजबळ , योगेश नवनाथ वजाळे उर्फ टकल्या आणी अभिषेक अनिल भडंगे हे तीघेही रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याचे आढळले. ताब्यातील दुचाकी ही हडपसर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या गुन्हयातील असल्याचे उघड झाला. त्यांच्याकडून 8 लाख 20 हजाराच्या 15 दुचाकी व बुलेट हस्तगत करण्यात आल्या आहेत.
तसेच दुसऱ्या कारवाईमध्ये ग्लायडिंग सेंटर बाजूला असलेल्या भिंतीपासून पळून जाताना पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी दोघांना पकडून तब्यात घेतले. त्यांची अंगझडती मध्ये एक गावठी बनावटीची पिस्तुल, मॅगझीन तसेच चोरीची KTM 200 गाडी आढळली. निलेश मधुकर आरते ( 23 रा तुकाई दर्शन हडपसर ) व संजय हरीश भोसले उर्फ सोन्या (रा शेवाळवाडी हडपसर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्या पोलिस कोठडीत केलेल्या तपासात 9 लाख 10 हजाराची दहा दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून एकूण 10 लाख 70 हजाराचा ऐवज हस्तगत झाला आहे. हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त (पुर्व) नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण ,पोलिस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलिस अंमलदार पाटील , सोनवणे, प्रताप गायकवाड , सैदोबा भोजराव, विनोद शिवले, नितीन मुंढे, श्रीकांत पांडुळे, शशिकांत नाळे, अकबर शेख , प्रशांत टोनपे, शाहिद शेख , निखिल पवार यांनी केली.