पिंपरी – गहुंजे स्टेडियम येथे होणाऱ्या विश्वचषक 2023 चे एकदिवसीय क्रिकेट सामने पाहण्यास जाणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी पीएमपीकडून पुणे मनपा भवन, कात्रज व निगडी टिळक चौक बस स्थानक या तीन ठिकाणांहून बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 मधील एकूण 5 सामने गहुंजे स्टेडियम येथे होणार आहेत. त्यास अनुसरून पीएमपीकडून गहुंजे स्टेडियम येथे जाण्यासाठी पुणे मनपा भवन, कात्रज व निगडी टिळक चौक बस स्थानक या तीन ठिकाणांहून बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार तीनही बस स्थानकांवरून जादा बसचे नियोजन करण्यात येईल. 19 व 30 ऑक्टोबर आणि 1, 8 आणि 11 नोव्हेंबरला हे क्रिकेट सामने होणार आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी निगडी टिळक चौक बस स्थानकातून पीएमपी बसची सुविधा असणार आहे. तरी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 साठी पीएमपीकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या बस सुविधेचा लाभ जास्तीत जास्त क्रिकेट शौकिनांनी घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.
पुणे मनपा भवन, कात्रज व निगडी टिळक चौक येथून ही बसची सुविधा असणार आहे. पिंपरी चिंचवड शहरवासीयांसाठी निगडी येथील टिळक चौकातून बसची सुविधा असणार आहे. 19 व 30 ऑक्टोबर आणि 1 व 8 नोव्हेंबरला टिळक चौकातून दुपारी 12 व दुपारी 12.30 वाजता बस सुटेल. तर, 11 नोव्हेंबरला सकाळी 8.30 व सकाळी 9 वाजता बस सुटेल. तिकीट दर हा 50 रुपये जाताना व येताना प्रत्येक व्यक्तीसाठी 50 रुपये असणार आहे.