सातारा – सातारा एमआयडीसीमध्ये सगळ्यात जास्त त्रास माथाडी कामगार नेत्यांचा आहे. उद्योजकांना त्याचा त्रास होत असतो. साताऱ्यातील दोन्ही राजांच्या कृपेने आज माथाडीमध्ये काही चुकीचे लोक दिसत नाहीत. पण आज जे काही माथाडीमधील राजकारणात दिसत आहेत. माथाडी कामगार कायदा यामधील दुरुस्ती समितीत सुदैवाने मी आहे, त्यामुळे त्यांना आम्ही हद्दपार करणार आहोत. जो स्वत:च्या पाठीवर ओझं उचलतो तो माथाडी, पण आज करोडो रुपयांच्या मर्सिडीज गाडीतून येऊन माथाडीचे मालक झाले आहेत. त्यामुळे एमआयडीसीत गुंडगिरी वाढली जात असल्याचा अप्रत्यक्ष निशाणा आ. महेश शिंदे यांनी आ. शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता साधला.
मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ साताराच्यावतीने (मास) राष्ट्रीय स्तरावरील मास औद्योगिक प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आ. महेश शिंदे म्हणाले, “”आज माथाडी नेत्यामुळे सातारा येथील एमआयडीसी वाढली नाही. कोटींच्या गाडीतून फिरणाऱ्या माथाडी नेत्यामुळे एमआयडीसीत दहशत निर्माण झाली, हा खरा येथील प्रश्न आहे. सातारा एमआयडीसीमध्ये नवनवीन उद्योग येत आहेत.
एमआयडीसीमध्ये रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. अडीअडचणी सोडविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. दरम्यान, वर्णे आणि निगडी गावच्या जागेतील नवीन एमआयडीसी प्रकल्पाचा प्रश्न आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आम्ही बसून चर्चा करुन लवकरच सोडवणार आहोत.”
सातारा एमआयडीसी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येते. या एमआयडीसीमधील समस्या सोडविण्यासाठी आमदार म्हणून मी प्रयत्न केले. निधी देऊन रस्त्यांची कामे करुन घेतली. पूर्वीची गुंडगिरी आता बंद होऊलागली आहेत. पण अजूनही गुंडगिरी म्हणजे काही लोक माथाडी नेते कंपन्यावर गुंडगिरी करत आहेत. त्यांनाही लवकरच हद्दपार करणार आहोत.
नव्याने माथाडी कायदा केला आहे. त्या समितीत मी असल्यामुळे येथील गुंडगिरीला लवकरच लगाम घालण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आयटी प्रकल्पांना सुविधा देणार ः आ. शिवेद्रसिंहराजे
दाआमदार शिवेंद्रराजे म्हणाले, “”सध्याच्या एमआयडीसीमध्ये उद्योजकांना, व्यावसायिकांना जागा कमी पडत आहे. नव्याने एमआयडीसीसाठी जागा हस्तांतरणाचा प्रश्न आहे. वर्णे आणि निगडी गावातील काही ग्रामस्थांचा गैरसमज झालेला आहे. तो दूर करण्यासाठी आमदार महेश शिंदे आणि मी बसून चर्चा करु. आमदार महेश शिंदे यांनी एमआयडीसीमध्ये रस्ते केले आहेत. तसेच राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन आरओ ऑफिस मंजूर करुन आणले आहे. त्या ऑफिसमधल कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविण्यात येईल.
ईएसआयचे हॉस्पिटल एमआयडीसीतील दूध डेअरीच्या रिकाम्या जागेत लवकरच केंद्र शासनाच्या योजनेतून उभारण्यात येणार आहे. देशभरात मोजकीच ईसएसआयची हॉस्पिटल मंजूर झाली आहेत. त्यामध्ये हे एमआयडीसीतील हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल झाल्यानंतर कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न सुटेल.” साताऱ्याच्या एमआयडीसीत खासगी आयटी कंपन्यांनी यावे. त्यांनी आपले प्रकल्प उभारावेत, त्यांना ज्या मुलभूत सुविधा आहेत, त्या देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.