मंचर – गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथील शेतकरी कैलास भगवंत गावडे यांनी चार बैली बैलगाडा शर्यतीसाठी लागणाऱ्या एका बैलाची उच्चांकी 30 लाख रुपयांना खरेदी केली आहे. “लक्ष्या’ नावाच्या बैलाची केलेली खरेदी बैलांच्या व्यापारात राज्यात सगळ्यात मोठी किंमत देणारी ठरली असल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
गावडेवाडी येथील शेतकरी आणि सद्गुरू कृपा व्हेजिटेबल कंपनी भाजीपाल्याचे व्यापारी कैलास भगवान गावडे आणि कुटुंबीयांनी बढेकरवस्ती, जारकरवाडी, धामणी खिंड (ता. आंबेगाव) येथील पोपट बढेकर यांच्याकडील लक्ष्या नावाच्या बैलाला 30 लाख किंमत दिली. ही आजवरची सर्वात उच्चांकी खरेदी ठरली असून, याची चर्चा बैलगाडा मालक व शौकिनांमधे आहे. याआधी औद्योगिक क्षेत्र असणाऱ्या भोसरी, मावळ, मुळशी, चाकण या परिसरातच मोठ्या किमतीच्या बैलांची खरेदी होत होती. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी बैलगाड्यांचा छंद हा किती महत्त्वाचा आहे, हे या विक्रमी खरेदीतून दाखवून दिले आहे.
स्व. भगवान गावडे नाव घाटात कायम
स्व. भगवान बाबुराव गावडे यांच्या नावावर पळणाऱ्या बारीमध्ये तीन चांगल्या स्वरूपाचे बैले आहेत; परंतु एका बैलासाठी इतरांचे सहकार्य घ्यावे लागायचे त्यामुळे गावडे यांनी स्वतःच्या दावणीला चांगल्या स्वरूपाचा चौथा बैल असावा या उद्देशाने आणि बैलगाडा घाटात गेल्यानंतर बैलगाडा शौकिनांची बारी पाहून मनोरंजन व्हावे, या भूमिकेतून ही खरेदी केली आहे. स्व. भगवान बाबुराव गावडे हे नाव बैलगाडा घाटात कायमच महत्त्वाचे राहिले आहे.
लक्ष्याची लक्षवेधी कामगिरी
कैलास गावडे यांनी खरेदी केलेल्या लक्ष्या या बैलाने यावर्षी सुरू झालेल्या बैलगाडा हंगामामध्ये इतर घाटामध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे. लक्ष्याची ही कामगिरी पाहून एवढी मोठी किंमत दिली आहे. याआधी या बैलाने भोरवाडी, काठापूर खुर्द, चाडोह, वडगाव कांदळी, नांदूर इत्यादी ठिकाणी झालेल्या बैलगाडा शर्यतीत घाटाचा राजा व फायनल मध्येही क्रमांक मिळवला आहे. नांदूर या ठिकाणी झालेल्या शर्यतीमध्ये सेमी फायनलच्या फेरीमध्ये या बैलाने घाटातील सर्वाचे लक्ष्य वेधले आणि फायनल मध्येही बक्षीस मिळविले आहे.
“बजरंगा’ची खरेदी 25 लाखांत
आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील शेतकरी शेतकरी आता मोठ्या किमतीच्या बैलांची खरेदी करू लागले असून, विक्रमी किंमत देत आहेत. जुन्नर तालुक्यातील किशोर दांगट यांनी काही महिन्यांपूर्वी “बजरंग’ नावाच्या बैलाची 25 लाख रुपयाला खरेदी केली होती. पंधरा दिवसापूर्वी पेठ (ता. आंबेगाव) येथील सरपंच राम तोडकर आणि ब्रिजेशशेठ धुमाळ यांनी 21 लाख 50 हजार रुपये किमतीच्या बैलाची खरेदी केली.
“सोमवारी (दि. 6) शेतकरी पोपट बढेकर यांच्याकडून लक्ष्याला खरेदी केल्यानंतर या बैलाने वाफगाव (ता. खेड) येथील यात्रेत याच दिवशी उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत घाटाचा राजा म्हणून किताब मिळविला.”
– कैलास गावडे, बैलगाडा मालक, गावडेवाडी