सोफिया (बल्गेरिया) – बल्गेरियात झालेल्या एका बस अपघातात किमान 46 जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये 12 लहान मुलांचाही समावेश आहे. ही दुर्घटना राजधानी सोफियाच्या वायव्येला एका महामार्गावर घडली. अपघातानंतर बसने पेट घेतला होता. बसमध्ये बहुसंख्य पर्यटक होते. हे सर्वजण तुर्कीवरून परतत होते. या अपघातातून 7 जण बचावले आहेत. भाजल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मरण पावलेले बहुतेक जण 20 ते 30 वर्षे वयोगटातील आहेत.
या अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. बस महामार्गावरून भरकटली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या अडथळ्यांवर जाऊन धडकली. मात्र बसला आग लागण्यापूर्वी ती धडकली का अपघातानंतर बसला आग लागली हे समजू शकलेले नाही. अपघात झाला तेंव्हा सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. मोठा आवाज झाल्याने ते जागे झाले, असे अपघातात वाचलेल्या एका प्रवाशाने सांगितले. काही प्रवाशांनी खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि बाहेर उड्या मारल्या. त्यामुळे ते जीव वाचवू शकले.
या भागातील रस्ता निसरडा झाला आहे आणि या ठिकाणी सातत्याने अपघात होत असतात, असे जवळपासच्या गावाच्या महापौरांनी सांगितले. बल्गेरियाचे हंगामी पंतप्रधान स्टेपन यानेव यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.