नवी दिल्ली – लोकसभेचे अध्यक्ष ओम बिडला यांच्याकडून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलाविली जाणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवार दि. 29 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. अधिवेशन सुरळीत चालावे आणि कामकाज व्हावे यासाठी सर्वपक्षांची बैठक बोलाविली जाणार आहे. ही बैठक रविवारी 28 नोव्हेबर रोजी होईल. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित केले जाईल. अधिवेशन 28 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे परत घेतल्यानंतर शेतकरी संघटना एमएसपीच्या मुद्यावर अडून बसले आहेत. शेतकरी बाहेर तर विरोधी पक्ष संसदेच्या दोन्ही सभागृहात हा मुद्दा रेटून लावण्याची तयारी करीत आहे. यामुळे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना खुले पत्र लिहून संघर्ष अद्याप संपला नसल्याचे स्पष्ट केले आहे. एमएसपीचा मुद्दा अजून बाकी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
याशिवाय महागाईवरही सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआयच्या संचालकांचा कार्यकाळ वाढविण्याचा मुद्दा सुध्दा विरोधकांच्या जिव्हारी लागला आहे. यासर्व विषयांवर सरकारला कोंडीत पकडण्याची विरोधकांची तयारी आहे. अशात, सर्पपक्षीय बैठकीत विरोधी पक्ष सहभागी होणार की नाही याकडे लक्ष लागून आहे.