फलटण – फलटण पालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रशासकीय राजवटीत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 155 कोटी 11 लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. या अंदाजपत्रकात शहरातील पायाभूत सुविधांसाठी तरतूद करण्यात आली असून, सलग तिसऱ्या वर्षी प्रकारची करवाढ न झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील करदात्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यसंस्काराचा खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
फलटण पालिकेच्या संजीवराजे नाईक निंबाळकर सभागृहात सोमवारी दुपारी 4 वाजता प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अंदाजपत्रकीय सभा झाली. सभेत गायकवाड यांनी सर्वप्रथम आरोग्य, पाणीपुरवठा, आस्थापना, जन्ममृत्यू व शहरविकास विभागाच्या आर्थिक वर्षातील मागण्यांचा आढावा घेतला. मुख्य लेखापाल महेश सावंत यांनी अंदाजपत्रक सादर केले. पायाभूत सुविधांसह शहरातील रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, दिवाबत्ती आदींसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
शहरातील खुल्या जागा, चौकांचे सुशोभिकरण केले जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले. बाणगंगा नदी संवर्धन दहा कोटी, अमृत शहर योजना 25 लाख, आरोग्य सुविधा पाच कोटी 42 लाख, पाणीपुरवठा सुविधा चार कोटी 26 लाख, माझी वसुंधरा अभियान 2022 50 लाख, दिव्यांग कल्याण योजना, महिला व बालकल्याण योजना, मागासवर्गीय दुर्बल घटक योजना प्रत्येकी 27 लाख 66 हजार रुपये, अशा अंदाजपत्रकातील ठळक तरतुदी आहेत.
करोना काळात घटलेली वसुली, चतुर्थ वार्षिक पाहणीचा खोळंबा, मोठ्या विकासकामांची लोकवर्गणी यामुळे पालिकेच्या तिजोरीवर प्रचंड ताण पडणार असूनही सलग तिसऱ्या वर्षी करवाढ न केल्याने नागरिकांना दिलासा दिला आहे. मुद्रांक शुल्क, रस्ता आणि कोर्ट अनुदान यांच्या थकबाकीतून पालिकेस पाच कोटी रुपये मिळणार आहेत. या सभेला साहाय्यक लेखापाल ज्ञानदेव खामगळ, मुख्य अभियंता पंढरीनाथ साठे, वसुली अधीक्षक वर्षा बडदरे, लेखा विभागाचे लिपिक राजेंद्र पवार व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.