पिंपरी -सर्वांनी आपल्याला “भाई’ म्हणून ओळखावे, भाईगिरीत आपले नाव व्हावे, यासाठी दोन अल्पवयीन मुलांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या बस सह नऊ वाहने फोडली. तसेच एका वाहन चालकाच्या खिशातील पैसेही जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
हनुमंत रोहिदास कसबे (वय 42, रा. लक्ष्मीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 7) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींनी दगडाच्या सहाय्याने नऊ वाहनांची तोडफोड कली. त्यामध्ये फिर्यादी कसबे यांच्या मोटारीचाही समावेश आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या खिशातून 800 रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
तपासादरम्यान चिंचवड पोलिसांना काही संशयितांची नावे समजली. त्यानुसार दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एका अल्पवयीन मुलाची आई वारली असून वडील त्याचा सांभाळ करतात. मात्र त्यांना दारूचे व्यसन आहे. मुलाला कबुतरे पाळण्याचा नाद असून त्याच्या वडिलांनी त्याला 70-80 कबुतरे विकत घेऊन दिली होती. त्यापैकी काही कबुतरे त्याने वडिलांच्या परस्पर विकली.
त्यामुळे वडिलांनी त्याला झापले. यामुळे रागावलेला अल्पवयीन मुलगा घराबाहेर आला. तो आपल्या दुसऱ्या अल्पवयीन मित्राला भेटला. अस जीवन जगण्यापेक्षा काहीतरी करून आपणच आपल नाव मोठ कराव, असे त्या दोघांनी ठरविले.
समाज आपल्याला घाबरला पाहिजे, लोकांनी आपल्याला भाई म्हणून ओळखल पाहिजे यासाठी त्या दोघांनी काहीतरी मोठ कांड करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एकाच्या सांगण्यावरून त्या दोघांनी मिळून परिसरातील नऊ वाहनांची तोडफोड केली.