जळगाव – 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेला भरधाव दुचाकीस्वाराने 20 ते 30 फुटांपर्यंत फरफटत नेले आहे. त्यानंतर महिलेच्या पोटावरून दुचाकी गेल्याने या घटनेत 21 वर्षीय गर्भवती महिलेचा व तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील वावडदा येथे घडली आहे. या अपघातानंतर महिलेच्या नातेवाईकांनी दुचाकीस्वारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तरच मृतदेह ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्योती दीपक गोपाळ असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. सुपडू ऊर्फ नाना विक्रम गोपाळ वय 25 असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, ज्योती या आपल्या दोन नणंदासोबत गावाबाहेर शौचास जात होत्या. दोन्ही नणंदा पुढे तर ज्योती त्यांच्या पाठीमागे चालत होत्या. दरम्यान समोरून भरदाव वेगात दुचाकीस्वार आला हे लक्षात येताच दोन्ही नणंदा बाजूला झाल्या मात्र ज्योती या गर्भवती असल्यामुळे त्यांना वेळीच हालचाल करता आली नाही. त्यामुळे गर्भवती असणाऱ्या ज्योती दुचाकीसोबत 20 ते 30 फूट फरफटत गेल्या व त्यांच्या पोटावरून दुचाकी गेली. या अपघातात ज्योती यांच्यासह त्यांच्या पोटातील बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे.