प्रशासनाचा अजब कारभार : रस्त्याच्या दुतर्फा सात मीटर रुंदीचे पदपथ
पिंपरी – गेल्या दहा वर्षांमध्ये सांगवी-किवळे बीआरटी मार्गावर 328 कोटी 73 लाखांचा खर्च झाला आहे. रस्त्याची जागा काही ठिकाणी ताब्यात नसतानाही रस्त्याच्या दुतर्फा सात मीटर रस्त्याचे सुशोभीकरण प्रयोजन केले आहे. तसेच रस्ता समतल करणे, चेंबर लेव्हल करणे अशा कामांसाठी 90 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
सांगवी ते किवळे हा 45 मीटर रुंदीचा बीआरटी मार्ग आहे. हा मार्ग प्रशस्त असून, त्यावर “बीआरटी’साठी स्वतंत्र मार्ग आहे. या रस्त्यावर गेल्या दहा वर्षांत विविध कारणांने तब्बल 328 कोटी 73 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामध्ये रस्ता, पदपथ, बीआरटी मार्ग, ग्रेडसेपरेटर या कामांचा समावेश आहे.
काळेवाडी फाटा ते किवळे या मार्गावरील दोन विभागात काम करण्यासाठी 60 कोटींची निविदा 1 ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पद्धतीने एकूण 90 कोटींचे काम केले जाणार आहे. काळेवाडी ते डांगे चौक मार्गावर अनेक ठिकाणी 45 मीटर रस्ता व पदपथ नाहीत. तसेच रावेत पूल ते किवळे मार्गावर केवळ 30 मीटरचा रस्ता आहे. त्यामुळे या संपूर्ण मार्गावर हा प्रकल्प राबविणे शक्य नाही.
सांगवी ते काळेवाडी फाटा मार्गाचे काम स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र हे काम स्मार्ट सिटीअंतर्गत करण्याचा डाव फसला. मात्र, त्याच कामासाठी 30 कोटींचा निधी सप्टेंबर महिन्याच्या महासभेमध्ये वर्ग करण्यात आला आहे. त्यास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.
नव्या कामात दोन्ही बाजूला प्रत्येकी 7 मीटर रूंदीचे पदपथ तयार करण्यात येणार आहे. रस्त्यामध्ये बीआरटीचा मार्ग असल्याने हा रस्ता अधिक अरूंद होऊन वाहतूक कोंडीत भर पडणार आहे. त्यामुळे या कामांची निविदा रद्द करून आर्थिक उधळपट्टी थांबवावी, अशी मागणी शिवसेना गट नेते राहुल कलाटे यांनी केली आहे.