पुणे -छत्रपती संभाजी महाराज यांनी देश-धर्मासाठी आयुष्याचे बलिदान दिले. महाराजांचा इतिहास शालेय विद्यार्थ्यांपासून तरुणांपर्यंत पोहोचवला जावा, अशी अपेक्षा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी गुरुवारी व्यक्त केली. शिवकालीन शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनांचे आयोजन करून ते शालेय विद्यार्थ्यांना दाखवले जावे, असेही रांका म्हणाले.
“जनहित चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा तिथीनुसार जयंती उत्सव एक जून रोजी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. भरत नाट्य मंदिर परिसर आणि इतिहास संशोधन मंडळाच्या आवारात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर रक्तदान शिबिर, युद्ध शस्त्रास्त्रे आणि अवजारांच्या प्रदर्शनाचे तसेच राष्ट्रीय कला अकादमी (न्यास) पुणेतर्फे महाराजांच्या 35 फुटी भव्य रांगोळीचे उद्घाटन रांका यांच्या हस्ते झाले. यावेळी दगडूशेठ गणपती मंडळ ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, जनहित चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश ढमढरे, दीपक ढमढेरे, पियुष विजयकुमार शहा, निलेश खानेकर, रोहन जाधव, अजित जाधवराव, हेमंत तिरळे, वसंत खुटवळ, मयूर काळे आदी उपस्थित होते.
सुमारे 350 वर्षांपुर्वीच्या शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले असून या प्रदर्शनात विविध तलवारी, कट्यार, भाले, खंजिर, बिचवा, वाघनखे, शिरस्त्राण, तोफा, तोफगोळे यांचा समावेश आहे. शिवगर्जना मर्दानी आखाडाचे अध्यक्ष हेमंत तिरळे यांनी प्रदर्शनाची माहिती दिली.
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित उपक्रमाची माहिती प्रकाश ढमढेरे यांनी प्रास्ताविकात दिली. सध्या पुणे शहरात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत असल्याने रक्तदान शिबिराद्वारे एक हजार रक्तपिशव्या संकलित करण्यात येणार असल्याचे ढमढेरे म्हणाले.