पिंपरी, (प्रतिनिधी) – पतीने केलेल्या अत्याचारामुळे एका महिलेचा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावेळी पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष कविता आल्हाट उपस्थित होत्या.
जवळा, ता. जामखेड येथील विवाहितेला अंगावरील जखमांमुळे दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या घटनेची माहिती रूपालीताई चाकणकर यांना पिंपरी चिंचवडच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्याकडून मिळाली. यावर आज शहरात असताना चाकणकर यांनी पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. पती सातत्याने करत असलेल्या मारहाणीमुळे पीडितेस या जखमा झाल्या व यातच तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे.