कवठे -पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वेळे, ता. वाई गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी 2.30 च्या सुमारास महिंद्रा बोलेरो गाडीने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत बोरी, ता. खंडाळा येथील उमा भगवान धायगुडे (वय 24) या विवाहितेचा मृत्यू झाला. उमा धायगुडे यांचा दोनच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता.
याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बोरी येथील भगवान धायगुडे (वय 27) व उमा हे दाम्पत्य मोटारसायकलवरून साताऱ्याकडे निघाल्या होत्या. त्यांची मोटारसायकल 2.30 च्या सुमारास वेळे येथील हॉटेल पार्कसमोर आली असता, पाठीमागून भरधाव आलेल्या महिंद्रा बोलेरोने मोटारसायकलला जोराची धडक दिली. त्यामुळे मोटारसायकल दुभाजकावर आदळून धायगुडे दाम्पत्य 50 ते 60 फूट फरफटत गेले.या अपघातात उमा धायगुडे यांच्या डोक्याला मार लागून, अतिरक्तस्राव झाला.
त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर भगवान धायगुडे यांच्या डोक्याला व हातापायांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यांच्यावर कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून, अधिक उपचारासाठी सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांनी हवालदार चंद्रकांत मुंगसे, दत्तात्रय धायगुडे, महिला पोलीस पी. एम. देशमुख यांना घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी उमा धायगुडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला.
बोलेरो चालकाने अपघातानंतर गाडी न थांबवता पळ काढला. तो थेट भुईंज पोलीस ठाण्यात हजर झाला. या प्रकरणी हवालदार मुंगसे तपास करत आहेत. या घटनेने बोरी गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, पंधरा दिवसांत याच ठिकाणी झालेला हा तिसरा अपघात आहे.