पुणे -विनापरवानगी रस्ते खोदले जातात आणि त्यानंतर त्याची डागडुजीही केली जात नाही. त्यामुळे चांगले रस्ते खराब होवून निधीचा अपव्यय होतो, अशा तक्रारी जिल्हा परिषद सदस्यांनी आरोग्य समितीच्या बैठकीत केल्या.
त्यावर जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रस्त्यांवर अनधिकृत रस्ते खोदाई करणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे यांनी दिली.
दुरसंचार कंपन्या, विविध संस्था, बांधकाम व्यावसायिक, खासगी व्यक्ती यांच्याद्वारे ऑप्टीकल फायबर केबल, जलसिंचन, ड्रेनेजलाईन, विद्युत केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाई केली जाते. त्यावेळी बहुतांश कंपन्या किंवा संस्था ज्या मालकीचे रस्ते आहेत,
त्यांची परवानगी न घेता परस्पर खोदाई करत असल्याचे समोर आले आहे. त्याबाबत नुकत्याच झालेल्या बांधकाम समितीच्या बैठकीत सदस्यांनी तक्रार केली होती, त्यावर वरील निर्णय घेण्यात आला आहे.