पुणे : शासकिय कोट्यातून (आरटीई ) मधून मुलीस पहिलीस प्रवेश मिळवून देण्यासाठी पालकाकडे सत्तर हजार रूपये लाचेची मागणी केली तसेच तडजोडीअंती 50 हजार रूपये लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पालक शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधीस पकडले. त्याच्यासह हवेली पंचायत समितीच्या शिक्षणअधिकार्यास अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रामदास शिवनाथ वालझाडे (वय 50, गटशिक्षणअधिकारी, वर्ग 2, पंचायत समिती ता. हवेली, जि. पुणे) आणि विकास नंदकुमार धुमाळ (वय 40, प्रवेश पडताळणी समिती सदस्य, पालक शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीसमोरील पदपथावर सापळा रचून एसीबीच्या पथकाने 1 सप्टेंबर रोजी दुपारी ही कारवाई केली.
मुलीस आरटीई शासकिय प्रवेश कोट्यातून पहिलीस प्रवेश मिळावा यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. मात्र, शिक्षण विभाग पंचायत समिती हवेली यांनी फिर्यादींच्या मुलीचा प्रवेश अर्ज अपात्र केला होता. म्हणून त्यांनी शिक्षण विभाग जिल्हा परिषद येथे अपील केले होते. फिर्यादींच्या घरी पालक शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी आणि प्रवेश पडताळणी समिती सदस्य विकास धुमाळ आले. त्यांनी मुलीचे प्रवेश अर्ज पात्र करून देतो परंतु त्यासाठी 70 हजार द्यावे लागतील असे सांगितले. मात्र, ही शासकिय फी नसून लाच असल्याचे लक्षात आल्याने तक्रारदाराने त्याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली होती.
एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता धुमाळ याने तक्रारदारांना भेटून गटशिक्षणाधिकारी वालझाडे यांच्यासाठी 55 हजारांची मागणी केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर 1 सप्टेंबर रोजी धुमाळ याने तक्रारदार आणि वालझाडे यांची भेट घडवून आणली. तसेच कार्यालयाच्या बाहेर आल्यानंतर तक्रारदाराकडू 50 हजार रूपये लाच म्हणून घेताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
अटक दोघांना गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांचे आवाजाचे नमुने घेणे, आरटीई प्रवेश संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अनेक तक्रारी प्राप्त असून त्यामध्ये आरोपीचा सहभाग आहे का याची पडताळणी करणे, वालझाडे यांच्या अंगझडतीमध्ये बॅगेत 45 हजार रूपये मिळाले असून त्याबाबत योग्य उत्तर दिलेले नसून त्याबाबत तपास करायचा आहे. याकारणांसाठी सहायक सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी दोघांना 5 दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त विजयमाला पवार या करीत आहेत.