पुणे – पुणे रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तींनी ही धमकी दिल्याचे समजते.त्यामुळे पोलीस प्रशासनाने रेल्वे स्थानकात धाव घेत डॉग स्कॉडसह छाननी सुरु केली. यावेळी एक्सप्रेस गाड्या देखील थांबवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे प्रवाश्यांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शनिवारी सकाळी हा सर्व प्रकार घडला यावेळी अनेक प्रवासी पुणे स्टेशनसह आजूबाजूच्या परिसरात देखील होते. बॉम्बने स्टेशन उडवून देण्याची बातमी समोर येताच स्टेशन परिसरात गर्दी कमी होताना दिसली. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवत ठिकाणाची पाहणी सुरु केली. श्वान पथकासह पोलिसांनी संपूर्ण रेल्वे स्टेशनची झडती घेण्यास सुरुवात केली.
रेल्वे स्थानकात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलीस संपूर्ण परिसराची पाहणी करत असून आजूबाजूच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बॉम्ब असल्याची धमकी कोणी व का दिली ? याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. तसेच कोणतीही लावारीस वस्तू आढळल्यास पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.