शिक्रापूर (पुणे) – वेळ नदी पात्रातील गटार लाइनमध्ये सोमवारी (दि. 9) एका महिलेचा संशयितरित्या मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणाचे गुढ अखेर शिक्रापूर पोलिसांनी उकलले असून चारित्र्याच्या संशयातून पतीनेच हे कृत्य केले असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पतीसह त्याच्या साथीदारांच्या शिक्रापूर पोलिसांनी नांदेड येथे जात रविवारी (दि. 15) मुसक्या आवळल्या आहेत. सोमवारी (दि. 16) त्यांना शिरूर न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली होती. त्यांना बुधवारी (दि. 18) न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची कोठडीत वाढ केली आहे.
पती फिरोज हबीब शेख (रा. शिक्रापूर, ता. शिरूर, मूळ रा. रंगार गल्ली ता. कंधार जि. नांदेड) आणि साथीदार फयुम शेख (रा. लोहा जि. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी की, शिक्रापूर (ता. शिरूर )येथे सोमवारी (दि. 9) ग्रामपंचायत कर्मचारी गटारलाइन स्वच्छ करत असताना एका महिलेचा संशयितरित्या मृतदेह आढळून आला होता. या महिलेच्या दोन्ही हातांच्या शिरा कापलेल्या, महिलेच्या गळ्यात तारेने आवळलेले असल्याचे आढळून आल्याने महिलेचा खून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. संबंधित महिला शिक्रापुरातील कुंभार वाडा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक उपनिरीक्षक नवनाथ रानगट, पोलीस शिपाई अशोक केदार यांनी महिला राहत असलेल्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता महिलेच्या गळ्यात असलेली हुबेहूब तार मिळून आली. तसेच आजूबाजूला चौकशी केली असता ही महिला चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची आणि महिलेचा पती दोन दिवसांपूर्वी गावाला गेला असल्याची माहिती समोर आली. शेजारील नागरिकांकडून वेगवेगळी कारणे पोलिसांना मिळाली, त्यांनतर नवनाथ रानगट, पोलीस हवालदार अमिनदिन चमनशेख, कृष्णा व्यवहारे, महेंद्र पाटील यांनी नांदेड येथे जात महिलेचा पती फिरोज शेख याला ताब्यात घेतले. त्याने काही वर्षांपूर्वी या महिलेसोबत प्रेमविवाह केला होता; मात्र महिलेचे मूळ गाव, नाव याबाबत त्याला काहीही माहित नव्हते. त्यामुळे अद्यापही मृत महिलेचे ओळख पटू शकलेली नाही. दरम्यान, ते दोघे मुलांसमवेत शिक्रापूर येथे राहत असताना त्याला महिलेच्या चारित्र्याबाबतचा संशय येत असल्याने त्याने महिलेचा मोबाइल तपासला असता त्यांची शंका अजूनही वाढली आणि त्यामुळे त्याने त्याच्या नात्यातील फयुम शेख यांच्या मदतीने पत्नीचा खून करून वेळ नदीच्या गटारलाइनमध्ये टाकला आणि दुचाकीहून नांदेड गाठल्याचे कबुल केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नवनाथ रानगट हे करत आहे.