सातारा -जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढले असून जिल्हा रेड झोनमध्ये आहे. एक चांगली बाब म्हणजे मृत्युचे प्रमाण खूपच कमी आहे. आरोग्य विभागाबरोबरच प्रशासन व पोलीस चांगले काम करीत असून आणखी रुग्ण वाढणार नाहीत, यासाठी सर्वांनी सुक्ष्म नियोजन करुन संसर्गाची साखळी तोडण्याचे काम करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी केल्या.
कराड येथील विश्रामगृहात करोना संसर्गाबाबत जिल्हा प्रशासन करती असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा डॉ. म्हैसेकर यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी करोनासंदर्भात जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. प्रतिबंधित क्षेत्र सोडून जिल्हाधिकारी लॉकडाऊनमध्ये सुट देत आहेत, असे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, “शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील बाजारपेठेंबाबत निर्णय घेतील. करोना संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर काम करीत आहे. याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा. ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेच्या कामांना मंजूरी द्यावी.’ नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, आपल्याबरोबर आपल्या घरातील ज्येष्ठ, लहान मुलांची काळजी घ्यावी, ज्येष्ठ नागरिकांनी व लहान मुलांनी घराबाहेर पडू नये.
ज्यांना गंभीर आजार आहेत अशांनीही घराबाहेर पडू नये. करोना विषाणूवर खात्रीशीर असे औषध नसले तरी तोंडाला मास्क लावणे, वेळोवेळी सॅनिटायझरने हात निर्जंतुक करणे व सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टींमुळे विषाणूचे संक्रमण आपण टाळू शकतो. वैयक्तीक व कौटुंबीक सुरक्षिततेसाठी मोबाईलवर आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करुन घ्यावे, असे आवाहनही डॉ. म्हैसेकर यांनी केले.