15 मार्चपर्यंत कार्यादेश दिलेलीच कामे करा; 40% कामे थांबवण्याच्या प्रशासनाच्या सूचना
पुणे – करोनामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यात 31 मार्च 2021 अखेरपर्यंत प्रशासनास मिळणाऱ्या अपेक्षित उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होणार आहे. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांनी सुरू केलेल्या 40 टक्के कामांना ब्रेक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या क्षेत्रीय कार्यालयांकडून वॉर्डस्तरीय निधीतून देखभाल-दुरूस्ती तसेच इतर कामे सुरू आहेत. या कामांची मुदत 31 मार्च असून, ही कामे जवळपास 300 कोटींपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे वर्षाअखेरीस या कामांची बिले द्यावी लागल्यास प्रशासनाचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी सर्व सहायक आयुक्तांची बैठक घेऊन याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिकेस वर्ष अखेरपर्यंत सुमारे 4,200 ते 4,500 कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. तर प्रत्यक्षात विकासकामे आणि वेतनासाठी खर्च तसेच करोनानंतर काढलेल्या निविदांनुसार, विकासकामांचा खर्च पाहता प्रशासनास 4,500 ते 4,800 कोटी रुपयांची बिले अदा करावी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेवर आर्थिक ताण येणार असून उत्पन्नापेक्षा खर्च अधिक झाल्यास प्रशासनाची आर्थिक कोंडी होणार आहे. त्यामुळे सध्या काढलेल्या निविदांमधील अनेक कामांना ब्रेक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची सुरूवात क्षेत्रीय कार्यालयांच्या कामापासून करण्यात आली आहे.
…तर अंदाजपत्रकावरील ताण कमी होणार
कामे स्थगित करण्याच्या सूचना देताना ज्या कामांना 15 मार्चपूर्वी कार्यादेश (वर्क ऑर्डर) देण्यात येईल, अशाच कामांना मंजुरी द्यावी, तसेच त्यांची बिले स्वीकारली जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर जी कामे शिल्लक राहतील, ती पुढील आर्थिक वर्षात घेण्याच्या सूचनाही सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मार्चअखेरीस अंदाजपत्रकावर येणारा ताण 100 ते 125 कोटींनी कमी होणार आहे.