पुणे – राज्यात पावसाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील 4 महिन्यांतील सरासरी 15 ते 20 दिवसांत ओलांडली आहे. त्याचबरोबर 1 जून ते 7 ऑगस्टदरम्यान सरासरीपेक्षा तब्बल 102.76 टक्के पाऊस जास्त झाला आहे; तर कोकणात 40 टक्के अधिक झाला आहे. मान्सूनचे अद्याप दीड महिना बाकी असल्याने या सरासरीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला सुरवात झाली, ती ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा आला तरी अद्याप कायम आहे. राज्यात साधारण सरासरी 674.6 मिलीमीटर पाऊस पडतो; पण 7 ऑगस्टपर्यंत तब्बल 693.4 मिलीमीटर नोंद झाली आहे. म्हणजे सरासरीपेक्षा 102 टक्के अधिक झाला आहे. त्याचबरोबर ही सरासरी पावसाने अवघ्या 1 महिन्यात गाठली आहे.
पुणे जिल्ह्यात 137 टक्के पाऊस
राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. याची टक्केवारी सरासरी 137 टक्के आहे. तर सर्वात कमी जालना जिल्ह्यात सरासरीच्या वजा 22 टक्के इतकाच झाला आहे. त्याखालोखाल बीड जिल्ह्यात उणे 38 टक्के पाऊस झाला आहे.