नवी दिल्ली – जगभरात करोना व्हायरसने थैमान घातल्यानंतर आता सर्वच देश करोना लस मिळविण्यासाठी धडपडत आहेत. अनेक लसींच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तर काही लसींच्या चाचण्या सुरू आहेत. मात्र चाचण्या पूर्ण झालेल्या लसींवर अनेकांनी संशय व्यक्त केला होता.
लसींवर संशय व्यक्त करणाऱ्यांमध्ये खुद्द ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो हे देखील सामील होते. मात्र आता जैर बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लसींच्या डोसची मागणी केली आहे. ब्राझीलला दोन कोटी डोस द्यावेत, अशी विनंती बोलसोनारो यांनी केली आहे. भारतात करोनावरील दोन लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्यानंतर ही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान अॅस्ट्रॉझेनेकाच्या लसीचा तात्काळ पुरवठा करावा, असं आवाहन बोलसोनारो यांनी केलं आहे. ऑक्सफर्ड आणि एस्ट्रॉझेनेकाच्या लसीला परवानगी मिळालेली असून, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ही लस तयार केली जात आहे. भारतात ही लस कोविशिल्ड नावाने बाजारात आणली गेली आहे.
ब्राझीलमध्ये राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम तातडीने सुरू करण्यासाठी भारतातील लसीकरण मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेत कोविड लसीचे २० लाख डोस तातडीने पाठवावे, असं बोलसोनारो यांनी पत्रात म्हटलं आहे.