उज्जेन- मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये मिरवणुकीत वाजणाऱ्या डीजेच्या मोठ्या आवाजामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे सुरू असताना मृत तरूण व्हिडीओ बनवत होता. त्याचवेळी तो जमिनीवर कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
डीजेच्या मोठ्या आवाजामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. उज्जैनजवळील अंबोडिया धरणावर राहणारा लालसिंह (18) हा त्याचा मित्र विजय याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी ताजपूरला आला होता. गावात विजयच्या लग्नाची मिरवणूक निघाली होती आणि मिरवणुकीत लालसिंह त्याच्या मित्रांसह डीजेच्या मागे नाचत होता.
लालसिंह मोबाईलवर व्हिडिओ बनवत होता. त्यानंतर अचानक नाचत असताना लालसिंह बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्याला उज्जैनला रेफर करण्यात आले. उज्जैनला पोहोचल्यावर डॉक्टरांनी लालसिंह यांला मृत घोषित केले.
शवविच्छेदन अहवालात, लाल सिंह याच्या हृदयात रक्ताची गाठ जमा झाल्याचे स्पष्ट झाले. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे हा प्रकार घडल्याचे रुग्णालयाचे डॉक्टर जितेंद्र शर्मा यांनी सांगितले.