दोन्ही पालख्यांचे आज पंढरीकडे प्रस्थान

पुणे – शहरामध्ये गुरूवारी विसावलेल्या पालख्या शुक्रवारी (दि.28)पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत. पहाटे 6 वाजता संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या निघणार असल्याचे मंदिरांच्या विश्‍वस्तांनी सांगितले.

आरती आणि धार्मिक विधींनंतर दोन्ही पालख्या हडपसरकडे रवाना होणार आहेत. हडपसर येथे काही वेळ दोन्ही पालख्या विसावा घेणार आहेत. यानंतर संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी सासवडच्या दिशेने मुक्कामासाठी रवाना होणार आहे. हडपसर, उरूळी देवाची, वडकीनाला, झेंडेवाडी असा आजचा पालखी मार्ग आहे.

तर संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसर, मांजरी फर्म, लोणी काळभोर रेल्वे स्टेशनमार्गे लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिरामध्ये मुक्काम करणार आहे.

काही मार्ग वाहतुकीसाठी बंद

पालख्यांचे भवानी पेठ आणि नाना पेठेतून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यामुळे शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. शुक्रवारी संत कबीर चौक, बेलबाग चौक, रामोशी गेट चौक, गोळीबार मैदान, मम्मादेवी चौक, वानवडी बाजार, मोरओढा चौक, भैरोबानाला चौक, जुना कॅनॉल रोड, रामटेकडी जंक्‍शन, हडपसर वेस जंक्‍शन, 15 नंबर फाटा, सोलापूर रोड, मंतरवाडी फाटा परिसरातील वाहतूक पहाटे पाच वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे. पालखी आणि दिंड्या शहराच्या हद्दी बाहेर प्रस्थान करेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अंतर्गत पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. त्याचबरोबर जड वाहतूक सोलापूर रोडने पुण्याकडे येण्यास बंद राहणार आहे. मंतरवाडी फाटा ते हडपसर गाडीतळ, खराडी बायपास ते मगरपट्टा मार्गे सोलापूर रोड आणि मालधक्‍का चौक ते पॉवर हाऊस चौकाचा समावेश आहे, त्यामुळे जड वाहतूक पर्यायी रस्त्याने करावी, असे वाहतूक विभागाकडून नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.