शिष्यवृत्ती परीक्षेत वाई तालुका अव्वल

वाई – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने फेब्रुवारी 2018 मध्ये इ. 5 वी करिता घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक पात्र विद्यार्थ्यांमध्ये वाई तालुक्‍याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तालुक्‍यातून एकूण 1510 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 639 विद्यार्थी (42.32 टक्के) या परीक्षेत पात्र झाले आहेत व 50 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.

50 विद्यार्थ्यांपैकी राज्य गुणवत्ता यादीत 6 विद्यार्थी आले आहेत. यामध्ये नगरपालिका शाळा क्र 5 मधील अस्मिता बाळासाहेब राऊत या विद्यार्थीनीने राज्यात तृतीय क्रमांक, संचित सचिन जाधव याने राज्यात पाचवा क्रमांक, श्रुतिका चंद्रकांत सुर्यवंशी या विद्यार्थीनीने राज्यात आठवा क्रमांक मिळविला आहे. नगरपालिका शाळा क्र.5 चे तालुक्‍यात सर्वाधिक 17 विद्यार्थी गुणवत्तायादीत चमकले आहेत. जि. प. प्राथमिक शाळा कडेगांवची विद्यार्थीनी शिवानी अजित भोसले ही ग्रामीण भागात तालुक्‍यात प्रथम आली आहे.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) करिता तालुक्‍यातून 1155 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये तालुका जिल्ह्यात द्वितीय स्थानावर आहे. सदर परीक्षेत तालुक्‍यातून 32 विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यापैकी 7 विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत आहेत. यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी (18) ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, पसरणीचे आहेत. याच विद्यालयाचा कारंडे जीवन संजित हा विद्यार्थी राज्यात सातव्या क्रमांकावर आहे.

इ.5 वी व 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये एकूण 29 प्राथमिक, माध्यमिक शाळांमधून एकूण 82 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येकी 41 विद्यार्थी आहेत. तसेच मराठी माध्यमाचे 54 व इंग्रजी माध्यमाचे 28 विद्यार्थी आहेत. या दोन्ही परीक्षेत एकूण 956 (35.87 टक्के विद्यार्थी) पात्र असून तालुका जिल्ह्यात द्वितीय क्रमांकावर आहे. सदर 82 विद्यार्थ्यांपैकी एकुण 5 शाळांमधून 13 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.