अबब! किती ही दक्षता

वाहनधारकांसह नागरिकांमधून प्रशासनाविरोधात खोचक प्रतिक्रिया

सातारा – सातारा शहरात प्रवेश करणाऱ्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील गटारावरील सिमेंटचे झाकण गेल्या अनेक महिन्यांपासुन मोडून पडले आहे. त्यामुळे याठिकाणी अपघाताची शक्‍यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या गटारावर झाकण नसल्याने अनेक वाहने याठिकाणी अडकून पडली होती. यामध्ये वाहनांचेही नुकसान झाले आहे. मात्र, त्यानंतरही संबंधित प्रशासनाला जाग आलेली नाही. वारंवार किरकोळ अपघाताच्या घटना घडू लागल्याने सध्या याठिकाणी बॅरिकेटने हे गटर झाकण्यात आल्याने “अबब! किती ही दक्षता’ अशी खोचक प्रतिक्रिया वाहनधारकांसह नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

शहरात सुरू असलेल्या विविध कामांमुळे साताऱ्यातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याने वाहने चालविणेही जिकीरीचे होऊन बसले आहे. शहरातील रस्त्यांची ही बोंब असताना सातारा शहराचे प्रवेशद्वार असलेल्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या चौकातील गटारावर असणारे झाकण मोडून याठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामध्ये वारंवार वाहने अडकून किरकोळ अपघातही झाले आहेत.

सुदैवाने अद्यापपर्यंत याठिकाणी मोठा अपघात झाला नसला तरी मोठ्या अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. वाहनधारक तसेच नागरिकांमधून तक्रारी वाढत असल्याने सध्या कुठे बॅरिकेटच्या सहाय्याने हे गटर झाकण्याची तत्परता संबंधित प्रशासनाने दाखविली आहे. परंतु, यामुळे अपघात टाळता येणार नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.