शिक्रापूर : पाबळ (ता. शिरूर) येथील जमदाडे मळा या ठिकाणी 1 मे महाराष्ट्र दिन या दिवशी दोघा चोरट्यांनी चोरी करत केलेल्या गंभीर हल्ल्यात दोघी मायलेकी जखमी झाल्याची घटना घडली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात चोरट्यांवर जबरी कोटी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाबळ येथील जमदाडे मळा या ठिकाणी राहणाऱ्या तुळसाबाई जाधव या 30 मार्च रोजी त्यांच्या शकुंतला जाधव या मुलीसह घरात झोपलेल्या असताना त्यांचा नातू कामावर गेलेला होता. त्यांनतर १ मे रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा वाजविल्याचा आवाज आला त्यामुळे आपला नातू कामावरून आला असेल असा समज त्यांचा झाल्याने तुळजाबाई जाधव यांनी घराचा दरवाजा उघडला, परंतु याच वेळी घराबाहेरील एका अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला असता यावेळी जाधव यांनी त्यास प्रतिकार करत त्याचा हात ओढून घेऊन त्याला चावा घेतला तसेच यावेळी घरात झोपलेल्या त्यांच्या मुलीला आवाज देत मदतीला बोलावून घेतले.
दरम्यान त्यांची मुलगी शकुंतला शिंदे ही त्यांच्याकडे मदतीसाठी धावून येत असताना याच वेळी घराबाहेर दबा धरून बसलेल्या दुसऱ्या युवकांने त्यांच्या शकुंतला शिंदे या मुलीचा हात पकडून तिच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करत तिच्या गळ्यातील गंठण ओढून घेतले. तर यावेळी झालेल्या झटापटीत दोघी मायलेकी घराबाहेर पडल्या व त्यानंतर तुळसाबाई जाधव यांनी शेजारी नागरिकांना मदतीसाठी बोलावले.
यावेळी शेजारील लोकांना तसेच शिक्रापूर पोलिसांना माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असताना शकुंतला शिंदे या गंभीर जखमी झाल्याने जमिनीवर पडलेल्या होत्या, तर सर्वांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील 2 सुटकेस, त्यामधील कपडे, पैशाची पिशवी चोरीला गेल्याचे दिसून आले. तर यावेळी तुळसाबाई जाधव या किरकोळ जखमी झाल्याने त्यांचावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शकुंतला शिंदे यांना शिक्रापूर येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, शिवराम खाडे यांसह आदींनी घटना स्थळी धाव घेतली असता या ठिकाणी काही युवकांच्या चपला मिळून आल्या. यावेळी तातडीने पुणे येथून श्वान पथकास देखील पाचारण करण्यात आले असता यावेळी श्वानने चक्क 3 किलोमीटर पर्यंत माग काढला परंतु चोरट्यांचा तपास लागला नाही.
सदर घटनेत चोरट्यांनी 1 तोळा वजणाचे सोन्याचे गंठण तसेच जुन्या कपड्यांच्या 2 सुटकेस व त्यामधील 3 हजार रुपये असा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत तुळसाबाई पर्वती जाधव (वय ७० वर्षे रा. जमदाडे मळा पाबळ ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी 2 अज्ञात युवकांवर जबरी चोरी प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे व पोलीस नाईक प्रताप कांबळे हे करत आहे.