फडणवीसांची सोशल मीडियावर बदनामी; पाच जणांवर गुन्हा दाखल

नाशिक – राज्यात करोनाने हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर होते. या दौऱ्यातील फडणवीस यांचा व्हिडीओ करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शिवराळ भाषेचा वापर करण्यात आला होता.

यासंदर्भात नाशिकरोड भाजप मंडळ अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी शनिवारी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीनुसार विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार गिरीश महाजन, आमदार जयकुमार रावल, खासदार डॉ भारती पवार, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले,महापौर सतीश कुलकर्णी आदी शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता पालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयाच्या दौऱ्यावर आले होते.

देवेंद्र फडणवीस यांनी (३० एप्रिल) नाशिक दौरा केला. यावेळी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी फडणवीस यांच्यासह येथील रुग्णालयांची पाहणी केली. मात्र नेत्यांची गर्दी पाहून रुग्णांच्या नातेवाईकांचाही संताप अनावर झाला. फडणवीस नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयाच्या पाहणी करत असताना रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांना वादग्रस्त शब्द वापरून हिणवलं. यावेळी गिरीश महाजन यांना देखील रुग्णांच्या नातेवाईकांनी खडे बोल सुनावले. या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान नाशिकमध्ये करोनाची स्थिती भीषण आहे. अशा काळात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवून गर्दी करणे विरोधीपक्षनेत्याला शोभत का, असा सवाल नातेवाईकांनी केला.  तुम्ही येथून माघारी जा, अशी नारेबाजी देखील केली. या सर्व प्रकारानंतर देवेंद्र फडणवीस हे मुकाट्याने आपल्या वाहनात जावून बसले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.