बारामती : येथील नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह, तारांगण महिला वसतिगृह, टीसी कॉलेज मुलींचे वसतिगृह, राजमाता अहिल्यादेवी होळकर वस्तीगृह, रयत भवन, विद्या प्रतिष्ठान मुलांचे व मुलींचे वसतीगृह या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांकरिता कोविड केअर सेंटर चालविले जात आहे.
यामध्ये प्रामुख्याने तेथील रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती साफसफाई रहावी याकरिता आवश्यक असणारे डस्टबिन बॅग, सॅनिटायगर, फिनेल, बेडशीट, सर्जिकल ग्लोज अशा विविध आवश्यक वस्तू इरफान इनामदार यांनी नटराज नाट्य कला मंडळाच्या अध्यक्ष किरण दादा गुजर यांच्याकडे सुपूर्त केल्या.
सध्याच्या कोरोना महामारीच्या काळामध्ये संपूर्ण जग अतिशय कठीण प्रसंगातून जात आहे. अशावेळी माणुसकीच्या भावनेतून गेली एक वर्ष नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने किरण दादा गुजर व त्यांची संपूर्ण टीम जे कार्य करीत आहे. त्या कार्यामध्ये आपणही सहभागी असावे या जाणिवेतून इरफान इनामदार यांनी नेमकी गरज ओळखून ही मदत दिली आहे. याबद्दल नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण दादा गुजर यांनी आभार व्यक्त केले.