बेल्हे, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शेती समृद्ध गाव म्हणून बोरीगावाची ओळख आहे. जुन्नर तालुक्यात विविध देवदेवतांची सर्वाधिक मंदिर असलेले गाव अशी या गावाची ओळख निर्माण झाली आहे. बोरीत तब्बल 42 पेक्षा जास्त मंदिर आहेत. त्यातील बहुतांश मंदिरे पुरातन काळातील आहेत.
बोरी हे पौराणिक गाव असून, ऐतिहासिक जुनी बाजारपेठ तसेच नगर ते जुन्नरमधील मोठी बाजारपेठ आहे. इंग्रजांच्या काळात मास्टर प्लॅन करून वसवलेले हे गाव आहे. गावात कोणत्याही चौकात उभे राहिले तरी संपूर्ण गाव दिसते. गावातील सगळे रस्ते सरळ आहेत. नदीकिनारी अनेक दगडी अवजारे पुरातन काळातील दगडी भांडी, हस्तिदंत, अवजारे येथे पाहावयास मिळत आहेत.
या गावात रेडामुख असून श्रीज्ञानेश्वर महाराज व त्यांची भावंड बोरीमार्गे आळंदीला गेल्याची आख्यायिका सांगितली जाते. दरम्यान, गावात असलेली बहुतांशी मंदिरे 100 वर्षांपेक्षा जुनी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सर्व जातींचे लोक येथे वास्तव्यास असून गावची सुमारे 6 हजार लोकसंख्या आहे.
गावात बुवासाहेब,बायजावाई, श्री हनुमान, श्री विश्वेश्वर, श्री भैरवनाथ, श्री राम (दोन मंदिरे), श्री मुक्ताबाई, श्री विठ्ठल- रुक्मिणी, श्री सिद्धेश्वर, श्री दत्त, मुक्ताई, गोसावीबाबा, बोलावाबा, श्री जनाई, श्री कमलामाता, पीरबाबा, श्री चारंगेश्वर, मोठा पीर, छोटा पीर, जालिंदर बाबा,
पीर बाबा, धावडे पीरबाबा, श्री बिरोबा महाराज, पीरबाबा, मोडके मळा श्री म्हसेश्वरा (दोन मंदिरे), कुंभारमळा श्री चारंगेश्वर, डेरेमळा मुंजाबाबा, जाधव मळा सदबाबा, धोंडबाबा, कोरडे मळा नानाबाबा, कोरडेमळा दावजीबाबा, ज्ञानेश्वर, वीर साहेब, हनुमान, धावजी बाबा, सावता माळी, चारंग बाबा, मुंजा बाबा, शनी, श्री गणपती ही मंदिरे आहेत.
बोरीगावात काशी अर्धेपीठ, पुरातन हेमाडपंती व विविध देवी देवतांची 42 मंदिरे आहेत. गावात पेशवेकालीन वाडे आहेत. गावच्या वैभवात भर टाकणारी कुकडी नदी वाहत आहे. वनिता डेरे, सरपंच, बोरी बोरी (ता. जुन्नर) : गावात असलेले श्री हनुमान मंदिर.