पुस्तकांनो, तुमचे मनःपूर्वक आभार!

तेवीस एप्रिल या दिवसाचे एक विशेष महत्त्व आहे. याच दिवशी जगप्रसिद्ध साहित्यिक-नाटककार-कवी विल्यम शेक्‍सपीअर याचा जन्म झाला आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे 23 एप्रिल हा जन्मदिन हाच शेक्‍सपिअरचा मत्युदिनही आहे.शेक्‍सपिअरला मानवंदना म्हणून 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक व लेखन हक्‍क दिवस म्हणून साजरा केला जातो.

उत्तमोत्तम पुस्तके वाचून त्यातून आनंद मिळवणारे जे भाग्यवंत असतात, त्यापैकी मी एक आहे. गेली कित्येक वर्षे मी सातत्याने वेगवेगळ्या विषयांवरची अनेक पुस्तके वाचत आले आहे. वाचताना त्यातला एखादा मजकूर फार म्हणजे फारच आवडून जातो आणि वाटते की, हे वाचलेले काही दिवसांनी आपल्या विस्मरणात तर नाही जाणार? किती महत्त्वाचे आहे हे! पुन्हा आठवेल का आपल्याला? मग मी सरळ माझी डायरी काढते. आणि पुस्तकातला आवडलेला भाग त्यात टिपून ठेवते. अशी कितीतरी पुस्तकांची टिपणे माझ्या डायरीत आहेत. मेघना पेठे, प्रिया तेंडुलकर यांच्या कथांमधली काही वाक्‍ये, एखादे विश्‍लेषण मला कधी माझ्या डायरीत सापडते. रंगनाथ पठारे, रत्नाकर मतकरी, मिलिंद बोकील यांच्या पुस्तकांतले उतारेच्या उतारे माझ्या वहीत लिहून ठेवलेले आहेत आणि कवितांची संख्या तर अगणित आहे.

भैरप्पांचे “पर्व’, “आवरण’; भानू काळेंचे “अंगारमळा’, “बदलता भारत’; दत्तप्रसाद दाभोलकरांवरील “रंग याचा वेगळा’; अभय बंग यांचे “माझा साक्षात्कारी हृदयरोग’; कविता महाजनचे “ब्र’, “भिन्न’, “ग्राफिटी वॉल’; विजय तेंडुलकरांचे “हे सारे कोठून येते’ …. अशी असंख्य पुस्तके मनात खोलवर रुतून बसली आहेत. दरम्यान, सतीश काळसेकरांचे “वाचणाऱ्याची रोजनिशी’ हे पुस्तक वाचून मी चकित झाले. अजून कितीतरी दर्जेदार वाङ्‌मय आपल्याकडून वाचायचे राहिलेय हे लक्षात आले.

मला आठवतं, लहानपणी माझ्या गावात वीज नव्हती. मग अंधार पडल्यावर दिसणार नाही म्हणून मी खिडकीत, दारात बसून दिवस मावळेपर्यंत अधाशासारखी वाचत असायची. एकदा एक पुस्तक काही हातून सोडवेना. खुर्चीवर बसले. डाव्या हातात कंदील धरून खुर्चीच्या हातावर थोडा टेकवून मी उजव्या हातात पुस्तक घेऊन वाचण्यात दंग झाले. दरम्यान, कंदील तिरका झाला. टाकीतले गरम तेल माझ्या मांडीवर ठिबकू लागले. पण वाचनात इतकी तंद्री लागलेली की, मांडीवर गरम लागतेय हे कळूनही ते काय आहे, हे बघण्याचेही भान राहिले नाही. शेवटी जास्तच आग व्हायला लागल्यावर मी पुस्तकातलं डोकं काढून पाहिलं तर मांडीवर गरम रॉकेल पडून मांडी भाजली होती. त्वचा लालबुंद होऊन त्यावर लहानलहान फोड आले होते. मी घाईघाईनं कंदील खाली ठेवून भाजलेल्या भागावर गार पाणी ओतून घेऊ लागले.

वाचनाचे हे वेड गेली कित्येक वर्षे तितक्‍याच तीव्रतेने टिकून राहिले आहे. दिवाळी अंक, कथाकादंबऱ्या, चरित्रे, वैचारिक… जे मिळेल ते वाचण्याचा सपाटा आजही तितकाच जोरदार आहे. दिवसा वाचत बसले तर घरातली कामं, नोकरी, संसार अवघड होऊन जातं. म्हणून मग मी लग्न झाल्यावर असा नियम घालून घेतला स्वतःसाठी की, दिवसा पेपर सोडून काही वाचायचं नाही. त्यातून मग रात्री जागून वाचायची सवय लागली. पण वाचन कधी थांबलं नाही. या वाचनानं मला आयुष्यात अवर्णनीय आनंद दिला. या पुस्तकांची, लेखकांची मी अत्यंत ऋणी आहे.

– माधुरी तळवलकर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.