पुस्तकांमुळे आत्मविश्‍वास वाढतो

वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचकांनी व्यक्‍त केल्या भावना

पुणे – महाराष्ट्राला साहित्य संस्कृतीची मोठी परंपरा आहे. मराठीत दरवर्षी सुमारे 5 हजार पुस्तके प्रकाशित होतात. प्रकाशकदेखील नवीन कल्पना वापरून वाचकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. पुस्तकांचा माणसाचा मित्र मानले जाते. आधुनिक युगात पुस्तकांचे स्वरूप बदलले असले तरी वाचक संख्या मात्र कमी झाली नसल्याचे प्रकाशक सांगतात.

लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणत्याही वयामध्ये पुस्तक प्रेरणादायी ठरते. पुस्तक सहज कोठेही, केव्हाही हाताळता येत असल्याने आपला “मित्र’ जवळ असल्याचे वाटते. तर अनेकदा कोणत्याही परिस्थितीत पुस्तक वाचल्यास अनोखी ऊर्जा मिळते. आत्मचरित्र्य, ऐतिहासिक, कथा, कविता प्रेरणा देतात. पुस्तकांमुळे आत्मविश्‍वास वाढतो, अशी भावना वाचकांनी दै. “प्रभात’कडे व्यक्‍त केली.

बदलत्या इंटरनेटच्या युगामध्ये ई-बुक्‍सची चलती असल्याचे चित्र दिसत आहे. लेखक आणि वाचक दोघांच्याही सोयीचे हे ई-बुक धावपळीच्या युगात वावरणाऱ्या वाचकांना दिलासा देणारे आहे. ई-बुक्‍सच्या माध्यमातून वाचक स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप आदी साधनांवर “डाऊनलोड’ करून वाचू शकतात. ई-बुक्‍समुळे वेळेची बचत होते. परवडणाऱ्या किमती, वाढती उपलब्धता, आकर्षक मांडणीमुळे वाचकांची ई-बुक्‍सला पसंती आहे.

पुस्तक आपला सगळ्यांत जवळचा मित्र असते, असे म्हणणे योग्य ठरेल. एकच पुस्तक आपण वेगवेगळ्या मूडमध्ये वाचू शकतो. पुढच्या पिढीमध्ये वाचन रुजवायचे असेल, तर वाचन प्रेरणा दिन रोज साजरा होणे आवश्‍यक आहे. पुस्तक वाचण्यात मिळणारा आनंद अन्य कोणत्याही गोष्टींमध्ये मिळत नाही. व्यक्‍तीला ऊर्जा देण्याचे महत्त्वाचे काम पुस्तकांमुळे होते. वाचकाला एका ठिकाणी बसून साहित्यिक भाषेमध्ये परिसराचे वर्णन, संस्कृती, परंपरा आदींची माहिती सहजपणे मिळणे हा वेगळा अनुभव असतो.
– रत्नदीप शिंदे

Leave A Reply

Your email address will not be published.