नवी दिल्ली – विदेशी चलन, अमली पदार्थ आणि सोन्यासारख्या वस्तूंची आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारी तस्करी रोखण्यासाठी सीमा शुल्क विभागाने देशातल्या 10 आंतरराष्ट्रीय विमानतळांवरच “फुल्ल बॉडी स्कॅनर’ बनवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, कालिकत, कोचीन, हैदराबाद, तिरुचिराप्पल्ली या प्रत्येक विमानतळावर असे 3 स्कॅनर बसवले जाणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अमली पदार्थ, विदेशी चलन, मौल्यवान धातूसारख्या गोष्टींची तस्करी करण्यासाठी या वस्तू शरीरातच दडवल्या जातात. बहुतेकवेळा या वस्तू गुदद्वारामध्ये लपवल्या जातात. दिल्ली विमानतळावरील अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे तस्करी करणाऱ्या अनेकांची ही चोरी पकडली आहे. म्हणूनच विमानतळांवर बॉडी स्कॅनर बसवण्याचा प्रस्ताव पुढे आला.
या स्कॅनरच्या पुढे सर्व प्रवाशांना यावे लागणार नाही. तर केवळ संशयास्पद व्यक्तींचीच स्कॅनरद्वारे तपासणी केली जाईल. मुंबई विमानतळावर असे स्कॅनर अलीकडेच बसवण्यात आले आहेत. या 30 एक्स-रे स्कॅनरसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील आर्थिक वर्षात हे स्कॅनर बसवले जातील, असे वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत रसद संचालनालयाचे मुख्य आयुक्त सुरेश किश्नानी यांनी सांगितले.