जालना – जालना जिल्ह्यात आज करोनाबाधितांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली आहे. जालन्यात दिवसभरात एकूण 24 रुग्ण करोनाबाधित आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या शंभरी पार गेली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा खडबडून जागे झाले आहे.
जालना जिल्हयात आज सापडलेल्या 24 जणांमध्ये अंबड तालुक्यातील मठ पिंपळगाव येथील सहा जणांचा समावेश आहे. याशिवाय अंबड येथील शारदानगर मधील 5, बदनापूर तालुक्यातील काटखेडा 5, बदनापूर 1,राज्य राखीव दलातील 1 जवान, आणि कोविड केअर सेंटरमधील 6 जणांचा समावेश आहे.
शारदानगरमधील 5 रुग्ण हे नुकतेच घाटकोपर, मुंबई येथून परतले आहेत. तसेच कोविड केअर सेंटरमधील 6 जण आणि इतर 12 असे 18 रुग्ण हे करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना लागण झाली असल्याची माहिती संबंधित अधिका-यांनी दिली. आज एकाच दिवशी रुग्ण संख्येत मोठी वाढ झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जालन्यात आता एकूण रुग्णांचा आकडा 110 वर पोहचला आहे.
बीडमध्ये 45 पैकी 41 निगेटिव्ह
बीड जिल्ह्यातील आज पाठविण्यात आलेल्या एकूण 45 अहवालापैकी तब्बल 41 अहवाल निगेटिव्ह आल्याने बीडवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. यातील फक्त 1 जण पॉझिटीव्ह आढळला असून अद्याप तीन जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. बीड जिल्ह्यात एकूण 55 करोनाबाधित संख्या असून तीन रुग्ण करोना मुक्त झालेले आहेत. बीड जिल्ह्यातून आतापर्यंत 974 अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये 852 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 22 जणांचे रिपोर्ट तपासणी करून यायचे आहेत. याशिवाय इतर जिल्ह्यातून आलेले व होम क्वॉरंटाईन केलेले 13158 नागरिक आहेत.