पुणे-नाशिक महामार्ग तब्बल १४ तास ‘ब्लॉक’

खेड घाटात ट्रक बंद पडल्याचा परिणाम

राजगुरूनगर – खेड घाटात रविवारी (दि. 24) पहाटे दोनच्या सुमारास ट्रक बंद पडल्याने खेड घाटासह महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. तब्बल 12 ते 14 तास महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. घाटाच्या पहिल्याच वळणावर एक ट्रक बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. ती सोडविण्यासाठी पोलीस आणि प्रवास करणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली. त्यात वाहन चालकांचा अतीताईपणा कोंडीला आणखी कारणीभूत ठरत होता.

रविवारी (दि. 24) दुपारी तीन वाजेपर्यंत हा ट्रक आहे त्याच जागेवर होता तो काढण्यासाठी क्रेन वाहतूक कोंडीतून पुढे नेता येत नसल्याने मोठी अडचण झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजूकडून वाहतूककोंडी झाली होती. पुणे-नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्यांनी वाहतुकीचे नियम पळाले तर वाहतूककोंडी होणार नाही. मात्र वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत नागरिक रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने बिनधास्तपणे चालवतात, यामुळे वाहतूककोंडी होते. महामार्गावरील खेड घाट जुना रस्ता असून तो अरुंद असल्याने व बाह्यवळणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने प्रवाशांचे कोंडीने मोठे हाल होत आहेत.

पुणे नाशिक महामार्गावरनाशिक फाटा ते संगमनेर अशा महामार्गाचे चौपदरी करणाचे काम बाह्यवळणरस्ते वगळता पूर्णत्वाकडे आहे. राजगुरूनगर येथील बाह्यवळण घाट रस्त्याचे काम गेली चार वर्षे रखडले होते ते आता कसे तरी संथ गतीने सुरू झाले आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात जड-अवजड वाहनांची मोठी गर्दी आहे. त्यातच पावसामुळे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्डे भरले मात्र, रस्त्याच्या कडेच्यासाईडपट्ट्या तशाच असल्याने हा महामार्ग मृत्यूचा साफळा बनला आहे.

देशातील सर्वाधिक वाहतूककोंडीचा महामार्ग म्हणून पुणे-नाशिक महामार्गाकडे आता पहिले जात आहे. सण, सुट्टीच्यावेळी या महामार्गावर मोठी कोंडी होते. त्यात राजगुरूनगर जवळील अरुंद रस्ता खेड घाटाची नागमोडी अरुंद रस्त्याची वळणे वाहतूककोंडीला निमंत्रित करीत आहेत.

प्रवासी तीन ते चार तास अडकले
विकेंड असल्याने आणि आळंदी येथे संजीवन सोहळा व कार्तिकी एकादशी साठी माउलींच्या दर्शनासाठी गेलेले भाविक आज या महामार्गाने परतीच्या प्रवासात असल्याने महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. पुण्याकडून नाशिककडे जाणारा सोयीस्कर महामार्ग असल्याने गर्दीच गर्दी होती. मध्यरात्री ट्रक घाट रस्त्याच्या पहिल्याच वळणावर बंद पडल्याने हजारो वारकरी अडकले याबरोबरच सुट्ट्यासाठी गावी गेलेलं फिरायला गेलेल्या प्रवाशांना वाहतूककोंडीत तीन ते चार तास अडकून बसावे लागले.

चार किलोमीटर रांगा लागल्याने हाल झाले. खेड घाट रस्त्याच्या बाह्यवळणाच्या कच्च्या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहने वळविण्यात आल्याने वाहतूककोंडी सुटण्यास मदत झाली. डाक बंगला ते खेड घाट रस्त्यापर्यंत वाहतूककोंडी तब्बल 12 ते 14 तास कायम होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.