नवी दिल्ली – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असताना आता ब्लॅक फंगस हा नवीन साथीचा आजार समोर आला आहे. या आजाराने देशाची चिंता अधिकच वाढवलीय. केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून ब्लॅक फंगस आजारासंदर्भात अलर्ट केले आहे. तसेच सर्व राज्य सरकारांना हा रोग साथीचा आजार म्हणून घोषित करण्यास सांगितले आहे. म्हणजेच आता राज्यांना ब्लॅक फंगस आजाराचे रुग्णांची माहिती, त्यामुळे मृत्यू झालेल्यांची तसेच उपचार सुरु असलेल्यांची नोंद ठेवावी लागेल.
राजस्थान, हरियाणा, तेलंगना आणि तमिळनाडू सरकारने याआधिच ब्लॅक फंगस आजाराला साथीचा आजार म्हणून घोषित केले आहे. दिल्लीत देखील या आजाराच्या रुग्णांच्या उपचारासाठी वेगळे सेंटर बनवले जात आहे.
दरम्यान, आरोग्य मंत्रालयाचे ज्वाइंट सेक्रेटरी लव अग्रवाल यांनी राज्यांना सुचित केले आहे की, ब्लॅक फंगस इंन्फेक्शन च्या केसेस मोठ्या प्रमाणात वाढत असून यामुळे करोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. आपल्यासमोर ही एक नवीन मोठी समस्या उद्भवली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच, अनेक राज्यांतील करोना रुग्णांमध्ये म्यूकर मायकोसिस नावाचे फंगल इन्फेक्शन झाल्याचे समोर आले आहे. ज्या लोकांना स्टेराॅईड थेरपी देण्यात आलीय आणि ज्यांचे शुगर लेवल अनियंत्रित आहे अशा रुग्णांमध्ये याचा धोका अधिक असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडे आली आहे.
या आजारावर विविध पद्धतीने उपचार करण्याची गरज असते. यात सर्जन, ENT स्पेशालिस्ट, जनरल सर्जन, न्यूरोसर्जन आणि डेंटल मैक्सीलो सर्जन यांचा समावेश असतो. या रुग्णांच्या उपचारासाठी एम्फ्टोथेरेसिन – B इंजेक्शनचा वापर करण्यात येतो. हे अॅंटीफंगल मेडिसिन आहे.
ब्लॅक फंगस आजाराला महासाथ अॅंक्ट 1897 नुसार लक्षणीय आजार म्हणून घोषित करण्यास सांगण्यात आले आहे. याद्वारे सरकारी आणि खासगी केंद्रांवर ब्लॅक फंगस आजारावर लक्ष ठेवणे, लक्षणे ओळखणे, आणि उपचार करणे याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआर द्वारे जाहीर करण्यात आलेल्या गाईडलाइनचे पालन करावे.
ब्लॅक फंगसच्या सर्व प्रकरणांचा अहवाल जिल्हा स्तरीय चीफ मेडिकल आॅफिसर कडे जमा करण्यात यावा, अशा सुचना केंद्राकडून राज्यांना करण्यात आल्या आहेत.
कोणत्या राज्यात काय स्थिती –
महाराष्ट्र – महाराष्ट्रात या आजाराची रुग्णसंख्या 2 हजारांजवळ आहे.
राजस्थान – राजस्थानमध्ये ब्लॅक फंगसमुळे 400 लोकांना अंधत्व आले आहे. जयपूर मध्ये 148 लोक हा आजार झाला आहे. जोधपुरमध्ये या आजाराची 100 प्रकरणे समोर आली आहेत.
मध्यप्रदेश – भोपाळमध्ये गेल्या 27 दिवसांत ब्लॅक फंगसचे 239 रुग्ण आढळले आहेत. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
दिल्ली – दिल्लीत ब्लॅक फंगस प्रकरणांची संख्या 300 पार गेली आहे.
हरियाणा – हरियाणात ब्लॅक फंगसचे 177 रुग्ण आहेत.
छत्तीसगड – येथे या आजाराची रुग्णसंख्या 100 पार गेली आहे.