भुवनेश्वर – करोना विषाणूची दुसरी लाट भारतासाठी अत्यंत घातक ठरली आहे. या लाटेमध्ये बाधितांच्या संख्येबरोबरच मृतांचा आकडाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. करोनामुळे होणारे मृत्यू वाढल्याने देशातील अनेक ठिकाणी स्मशानाबाहेरही रांगा लागल्याचे हृदयद्रावक चित्र पाहावे लागत आहे. करोनाचे हे संकट ओडिशातील राज्यसभा खासदार व पद्म विभूषण सन्मानित शिल्पकार रघुनाथ मोहपात्रा यांच्या कुटुंबियांसाठी जीवघेणे ठरले आहे. ( raghunath mohpatra son dies of corona )
याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रख्यात शिल्पकार रघुनाथ मोहपात्रा यांचे करोनाबाधेमुळे ९ मे रोजी निधन झाले होते. यानंतर त्यांचा मुलगा व ओडिशा रणजी संघाचा माजी कर्णधार प्रशांत मोहपात्रा काल (बुधवार १९ मे) करोना विषाणू संसर्गामुळे मृत्युमुखी पडला. अशातच वडील व मुलाच्या मृत्यूमुळे दुःखात असलेल्या मोहपात्रा कुटुंबावर आज आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला.
रघुनाथ मोहपात्रा यांचे ज्येष्ठ पुत्र जशोवंत मोहपात्रा यांचेही आज करोनामुळे निधन झाले आहे. ते ५२ वर्षांचे होते. जशोवंत यांच्यावर भुवनेश्वर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
तत्पूर्वी, ७८ वर्षीय राज्यसभा खासदार रघुनाथ मोहपात्रा यांचे ९ मे रोजी भुवनेश्वर येथील एम्स रुग्णालयात निधन झाले होते. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा प्रशांत याचा देखील करोनाबाधेमुळेच १९ मे रोजी एम्स रुग्णालयात मृत्यू झाला होता. अशातच आज मोहपात्रा कुटुंबाला जशोवंत मोहपात्रा यांच्या जाण्याने आणखी एक धक्का बसला आहे. ( raghunath mohpatra son dies of corona )
Odisha | Eldest son of MP &Padma Vibhushan Raghunath Mohapatra, Jashobanta Mohapatra passed away today in Bhubaneswar. His other son Prasanta Mohapatra, former captain of Odisha Ranji Trophy cricket team, died of COVID y’day. Raghunath Mohapatra had succumbed to COVID19 on May 9
— ANI (@ANI) May 20, 2021