Sushilkumar shinde : राहुल गांधी यांच्या ‘भारत न्याय यात्रा’ सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी देखील मोठे विधान केले आहे. ‘मला आणि प्रणिती शिंदेला दोन वेळा भाजपाची ऑफर मिळाली’, असा गौप्यस्फोट सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत.
विशेष म्हणजे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आज सोलापूर येथे सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सुशील कुमार शिंदे काय म्हणाले ?
सुशील कुमार शिंदे म्हणाले की, “भाजपचे काही नेते मला आणि प्रणितीला भाजपामध्ये या म्हणून सांगत होते. पण ते कसं शक्य आहे. ज्या आईच्या कुशीत आम्ही वाढलो, जिथे आमचे बालपण गेले, जिथे आम्ही वाढलो. आता मी ८३ वर्षांचा झालो, आता कसं दुसऱ्याशी घरोबा करणार? हे शक्य नाही. प्रणितीबद्दल तुम्हाला माहितीच आहे, ती पक्ष बदलण्याच्या भानगडीत पडणार नाही.”
पुढे ते म्हणाले, “भाजपकडून मला आणि प्रणिती शिंदेला दोन वेळा ऑफर दिली आहे. माझा दोन वेळा पराभव होऊनही मला ऑफर दिली जाते. माझे संपुर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये गेल्यामुळे मी हा निर्णय कसा काय घेऊ शकतो,” असेही ते म्हणाले. सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसच्या स्नेहसंमेलन सोहळ्यात सुशीलकुमार शिंदे बोलत होते.
यावर आमदार नितेश राणे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “प्रणिती शिंदे 2024 साली निवडून येणार नाही, ही खात्री असल्यामुळेच कदाचित ते असे विधान करत असावेत. जेणेकरून प्रणिती शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश होण्याचा मार्ग सोपा होईल.”