नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने पुन्हा एकदा राज्यातील निवडणुकीत आपली चमक दाखवली आहे. राज्यात पालिका निवडणुकांमधील निकाल आज जाहीर होत आहेत. विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीतही मोठा विजय मिळवत पुन्हा एकदा आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. दरम्यान सुरुवातीचे कल आले आहेत त्याप्रमाणे ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा भाजपाला जोरदार दणका दिला आहे.
कोलकाता महापालिका निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजयी वाटचाल सुरु केली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार तृणमूल १३४ जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे भाजपा ३, डावे ४ आणि काँग्रेस फक्त दोन जागांवर आघाडीवर आहे.
कोलकातामध्ये १६ मतदान केंद्रांवर १४४ वॉर्डमधील मतमोजणी सुरु आहे. मतमोजणी सुरु असल्याने कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आले आहे. तसंच २०० मीटर परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना २०० मीटरच्या अंतरात प्रवेश करण्याची परवानगी नाही. सुरक्षेची पूर्ण जबाबदारी कोलकाता पोलिसांकडे आहे. याशिवाय करोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर उपस्थितांना दोन्ही लस घेतलेले असणे अनिवार्य आहे.