हर्षवर्धन पाटील : इंदापूर तालुक्यात श्वेतक्रांतीसाठी एल्गार
रेडा- लॉकडाऊनचा फटका बसलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची अद्याप राज्य शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे शासनाने गाईच्या दुधास प्रतिलिटर 30 रुपये दर द्यावा, यासह अन्य प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी इंदापूर शहरासह तालुक्यात सकाळी 11 वाजता गावोगावी भाजपच्या वतीने शनिवारी (दि.1) ऑगस्ट रोजी दूध दरवाढीचे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने राज्य सरकारला शेतकऱ्यांकडील सर्व दुधाची खरेदी करण्यात यावी, अतिरिक्त दुधाची शासनाने भुकटी तयार करावी, दुधास प्रतिलिटर 10 रुपये अनुदान द्यावे, आदी मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र, राज्य शासनाने या मागण्या मान्य न केल्याने भाजप महायुतीतील रयत क्रांती, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), रासप आणि शिवसंग्राम या मित्र पक्षांसह शनिवारी (दि.1) राज्यभर आंदोलन करून राज्य सरकारला दरवाढीचा निर्णय घेण्यास भाग पाडू, असा विश्वास व्यक्त केला आहे.
पाटील म्हणाले की, भाजपच्या वतीने दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी (दि.21) राज्यव्यापी आंदोलन केले होते. त्यादिवशी इंदापूर येथेही आंदोलन करून उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्याकडे पाठविले होते.
करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
हॉटेल व अन्य व्यावसायिकांकडून खरेदी थांबली आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर 17 ते 19 रुपये इतका दर दिला जात असल्याने दुधाचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही, अशी विदारक स्थिती आहे. राज्यभरातील अन्य दूध उत्पादकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाजप न्याय मिळवून देईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.