राज्यसभा निवडणुकीआधी कॉंग्रेसची आणखीच गोची
गांधीनगर : गुजरातमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एकमेव आमदाराने राज्यसभा निवडणुकीसाठी सत्तारूढ भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे कॉंग्रेसची आणखीच गोची झाली आहे.
गुजरातमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या 4 जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होणार आहे. भाजपने 3 तर कॉंग्रेसने 2 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे निवडणूक अटळ बनली आहे. अशातच कॉंग्रेसच्या 5 आमदारांनी मागील काही दिवसांत राजीनामे दिले. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना राज्यसभेवर निवडून देणे कॉंग्रेससाठी अवघड बनले आहे.
कॉंग्रेसचा मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीचा कांधल जडेजा यांच्या रूपाने गुजरातमध्ये एक आमदार आहे. मात्र, जडेजा यांनी मंगळवारी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा जाहीर केला. गुजरात सरकारच्या मदतीने माझ्या विधानसभा मतदारसंघाचा विकास शक्य होईल.
त्यामुळे सत्तारूढ भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. तो निर्णय घेताना त्यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला विश्वासात घेतले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, गुजरातमधील आणखी आमदार फुटू नयेत याची दक्षता कॉंग्रेसकडून घेतली जात आहे. त्यातून कॉंग्रेसने आपल्या आमदारांना राजस्थानच्या जयपूरला हलवले आहे.