भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी ‘आप’चा मास्टर प्लॅन
नवी दिल्ली: कडाक्याच्या थंडीत दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. दिल्ली निवडणूक 2020 च्या मतदानाची तारीख जशी-जशी जवळ येत आहे. तसे सर्व राजकीय पक्ष राजकीय बाण सोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकीकडे भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व बड्या नेत्यांना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यंत दिल्लीत आणले आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टीने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपने त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थकांना दिल्लीतील सर्व 70 विधानसभा जागांवरील भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थकांचा डेटा देण्यात आला आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 5 हजार आप कार्यकर्ते आणि समर्थकांना 15 हजार भाजप समर्थकांशी संपर्क साधण्याची आणि निवडणुकीच्या दिवशी त्यांना बूथवर आणून आपच्या बाजूने मतदान करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. म्हणजेच ‘आप’ ने आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला किंवा समर्थकांना तीन भाजप समर्थकांपर्यंत ‘आप’ च्या बाजूने आणण्यासाठी नवीन रणनीती आखली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आप’ ने सोमवारीपासूनच या रणनीतीवर काम सुरू केले आहे. शनिवारी 8 फेब्रुवारी रोजी दिल्लीत मतदान होईल आणि गुरुवारी 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी निवडणूक प्रचार संपेल. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी 11 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे.