Chandrashekhar Bawankule – कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivali) लोकसभा मतदारसंघ हा भाजपला (Bjp) मिळावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे हे खरे, पण त्याबाबतचा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेणार असल्याचे महत्त्वपूर्ण वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी केले आहे.
यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघावर भाजपची नजर असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. हा मतदारसंघ कोणत्याही पक्षाकडे गेला तरी ही जागा निवडून आणण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील असेही त्यांनी म्हटले आहे.
बावनकुळे यांची महाविजय 2024 संकल्प दौरा रविवारी डोंबिवलीतून सुरू झाला. यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी हा मतदारसंघ भाजपकडे ठेवावा अशी मागणी केली. कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजप कार्यकर्त्यांनी देखील दावा केला आहे.
गेला काही काळ भाजपकडून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे या मतदारसंघात दौरे झाले आहेत. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे.
ठाकूर यांनी मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर आता भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात कार्यकर्ते सांगतील तोच उमेदवार मान्य केला जाईल असा पवित्रा काही दिवसांपूर्वी घेतला होता. अन्य कोणी उमेदवार दिल्यास सहन करणार नाही, अशी भूमिका भाजपच्या बैठकीत घेण्यात आली होती.
कल्याण, ठाणे या जागा भाजपच्या
कल्याण, ठाणे, पालघरसह संपूर्ण ठाणे जिल्हा एकेकाळी भाजपच्या होता. कल्याणच काय ठाण्याची जागाही भाजपचीच आहे. आमच्या पक्षाचे रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे, जगन्नाथ पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी या जागांचे प्रतिनिधित्व केले आहे, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी बोलताना संजय केळकर यांनी केले होते.
राजन बाबुराव विचारे हे ठाणे लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. 2019 मध्ये विचारे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांना एकूण 7,40,969 मते मिळाली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रकाश परांजपे यांनी निवडणूक लढवली होती.
परांजपे यांना एकूण 3,28,824 मत मिळाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याणचे खासदार आहेत. 2019 मध्ये त्यांना 5,59,723 मते मिळाली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे बाबाजी बाळाराम पाटील यांना 2,15,380 मते मिळाली होती.