गांधीनगर – गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टी दोन तृतीयांश बहुमत मिळवून विजयी होईल असा दावा पक्षाचे नेते अमित शहा यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील सभा सुरू झाल्या आहेत. भाजपची अडीच दशकापासून येथे राजवट आहे व यंदा इतिहास रचण्याची पक्षाने तयारी केली आहे. मात्र मोदी, शहा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशिवाय अन्य चार नेत्यांवर भाजपने यावेळी गुजरातची जबाबदारी सोपवली आहे.
प्रदेशाध्यश सी. आर. पाटील, ज्येष्ठ नेते पुरूषोत्तम रूपाला, जीतू वाघानी आणि युवा नेते आणि राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी ही त्यांची नावे आहेत. वाघानी हे गुजरातचे शिक्षण मंत्री आहेत. तर रूपाला केंद्रात मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत.
सी. आर. पाटील: पाटील हे भाजपच्या गुजरात वर्तुळात दिग्गज नेते मानले जातात. जुलै 2000 मध्ये त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांनी त्यांची उपयुक्तता सिध्द करत पोटनिवडणुकीत भाजपच्या सर्व 8 उमेदवारांना निवडून आणले. त्यानंतर पुढच्या वर्षी झालेल्या स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकीतही भाजपचे स्थान भक्कम ठेवले.
मोदी आणि शहांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या पाटील यांनी सूरत येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेतले आहे. तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनसंपर्कात ते तरबेज मानले जातात. पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कधी नोकरी केलेल्या पाटील यांनी नंतर तीनदा लोकसभेवर निवडून जाण्याची किमया करून दाखवली आहे.
जीतू वाघानी: राज्याचे शिक्षण मंत्री असलेले वाघानी गुजरात भाजपचा लोकप्रिय चेहरा मानले जातात. लेवा पाटीदार समाजात त्यांची चांगली पकड असल्याचेही बोलले जाते. 2012 मध्ये भाजपमधूनच त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दिला सुरूवात केली आहे.
हर्ष संघवी: राज्याचे गृहराज्यमंत्री असलेले हर्ष संघवी सध्या बरेच चर्चेत आहेत. अमित शहांच्या राजकीय जिवनाच्या सुरूवातीच्या काळात हे पद शहा यांच्याकडे होते. ते हर्ष यांच्याकडे युवा वयातच दिल्यामुळे त्यांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे खुद्द मोदीही प्रभावित झाले असल्याचे बातम्यांमध्ये म्हटले जाते. गेल्या निवडणुकीच्या वेळी पाटीदार आंदोलनामुळे सूरतमध्ये भाजपला मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हर्ष संघवी यांनी मोदींच भव्य रॅली प्रचंड यशस्वी करून दाखवली.
पुरूषोत्तम रूपाला: विजय रूपानी यांची अचानक उचलबांगडी केल्यानंतर पहिल्यांदाच निवडून आलेल्या भूपेंद्र पटेल यांना भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री केले. मात्र त्यांचा प्रभाव अद्याप दिसून आलेला नाही. त्यामुळे मोदी आणि शहांसोबत केंद्रात काम करणारे रूपाला गुजरातचे मुख्यमंत्री होऊ शकतात असे मानले जाते आहे. 1980 पासून ते राजकारणात असून कदवा पाटीदार समाजाचे प्रतिनिधित्व करतात.