जखमींच्या शस्रक्रिया तसेच औषधांचाही खर्च उचलणार
पुणे: दिवे घाटात वारकरी दिंडीला अपघात झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन वारकऱ्यांच्या वारसांना भारतीय जनता पार्टी आपल्या आपदा ट्रस्टमधून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करेल तसेच गंभीर जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या शस्त्रक्रियेसह सर्व उपचारांचा खर्च भाजपातर्फे करण्यात येईल, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी जाहीर केले.
या अपघातातील जखमींवर पुण्यातील हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत. चंद्रकांत पाटील यांनी कार्तिकी वारीतील अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांची हॉस्पिटल मध्ये जाऊन विचारपूस केली. संत नामदेव महाराजांचे वंशज सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज आळशी यांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना भाजपातर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.
आज सकाळी #पुणे येथील दिवे घाटात झालेल्या अपघातामधील जखमी वारकऱ्यांची हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. pic.twitter.com/U5IEKPNqIZ
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 19, 2019
दरम्यान संत नामदेव महाराज यांची पालखी पंढरपूरवरून आळंदीला जात असताना मंगळवारी सकाळी अपघात झाला. ही पालखी दिवेघाटात असताने जेसीबी अचानक या पालखीत घुसल्याने हा अपघात झाला आहे.