बंगळुरू – लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामात भारतीय जनता पार्टीला आज कर्नाटकात आणखी एक हादरा बसला आहे. पक्षाचे विद्यमान खासदार कराडी सांगन्ना यांनी पक्षाला रामराम करत आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. ( BJP MP Karadi Sanganna joins Congress)
कोप्पल मतदारसंघातून दोन वेळा विजयी झालेले सांगन्ना यंदा पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज होते. त्यामुळेच त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री सिध्दरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि कॉंग्रेसच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनी सांगन्ना यांचे कॉंग्रेसमध्ये स्वागत केले आहे.
कर्नाटकात अनेक विद्यमान खासदारांचे तिकिट कापल्यामुळे भाजपला बंडखोरीचा राज्यात मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत या राज्यांतून भाजपचे बहुसंख्य खासदार लोकसभेवर निवडून गेले आहेत. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला राज्यात फटका सहन करावा लागला व सत्ता गमवावी लागली.
आता तेच वातावरण कायम राहीले तर भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ज्या खासदारांचे प्रगती पुस्तक चांगले नाही त्यांना घरी बसवत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा धोका भाजपने सगळ्यांच राज्यात पत्करला असला तरी जुन्या नेत्यांच्या नाराजीचा फटकाही त्यांना बसतो आहे.